
सामना ऑनलाईन । कोलकाता
सनईचे मंगल सूर, मंगलाष्टकांचा घुमणारा आवाज, दोन हजार पाहुण्यांना दिलेले निमंत्रण, धोती-कुडत्यातील वर आणि बनारसी साडीतील वधू… एकमेकांपासून सहा फूट अंतरावर उभे. शंख निनादला आणि ढोलताशे कडाडले…एक अनोखा विवाह पश्चिम बंगालमध्ये बुधवारी पार पडला. वड आणि पिंपळाच्या झाडाचा हा विवाह. कोणत्याही बॉलीवूड सेलिबेटींच्या लग्नाएवढीच चर्चा या दोन झाडांच्या लग्नाची आहे.
कोलकातापासून 15 किलोमीटरकरील सोडेपूर गावात प्रणय (वड झाड) आणि देबराती (पिंपळ) नावाच्या दोन झाडांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. प्रणय (वड) बारा कर्षांचा आहे तर देबराती नावाची वधू (पिंपळाचं झाड) 10 कर्षांची आहे. दोघेही अल्पवयीन असले तरी त्यांच्या लग्नाला कुणी विरोध केला नाही, उलट लग्नाचे आयोजन करणाऱ्यांचे पाहुण्यांनी तोंडभरून कौतुक केले. पुढील काळात वधूवरांची चांगली काळजी घेऊ अशी ग्वाहीही आयोजकांनी दिली. प्रणयला सोमा नाग यांनी दत्तक घेतले आहे. ही दोन्ही झाडे सहा फुटांवरच आहेत. दोघांशी माझं नातं घट्ट झालं असे सोमा यांनी सांगितले.
…आणि पाहुणे भावुक झाले
प्रणय आणि देबरातीच्या लग्नासाठी दोन हजार वऱ्हाडी नटूनथटून आले होते. तरुणांनी नवविवाहित जोडप्यासोबत सेल्फीही घेतला. सुनीती सरकार आणि कमल हे वधू देबरातीचे आईवडील होते तर सोमा आणि त्यांचे पती सुप्रकाश नाग हे प्रणयचे आईवडील होते. परंपरेनुसार नाग यांनी सकाळपासूनच व्रत केले. या लग्नात पंगतीही उठल्या. जेवणात पाहुण्यांना मिठाई आणि खिचडी देण्यात आली. हा अनोखा सोहळा ‘याचि देही…’ अनुभवताना अनेक पाहुणे भावुकही झाले होते.


























































