
मुंबईत ‘तौकते’ वादळामुळे शेकडो झाडे-फांद्या कोसळल्यामुळे शहरात यापुढे वृक्ष लागवड करताना वादळातही टिकणारी मजबूत झाडे लावण्यात येणार आहेत. यासाठी विशेष धोरणही तयार केले जाणार आहे. तसेच मुंबईतील सर्व झाडांच्या मजबुतीचे नियमितपणे ऑडिटही केले जाणार असल्याचे आज पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई किनारपट्टीवरून गेलेल्या ‘तौकते’च्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा फटका शेकडो झाडांना बसला. पालिका क्षेत्रात वाऱयाच्या वेगाने तब्बल 114 किलोमीटर प्रती तास पेक्षा अधिक वेग गाठल्याचे दिसून आले. याच वेगवान वाऱयामुळे पालिका क्षेत्रात 812 झाडे पडली. यातील 504 झाडे ही खासगी क्षेत्रातील असून 308 झाडे ही सार्वजनिक परिसरातील आहेत. पालिका क्षेत्रातील 812 झाडे पडण्याव्यतिरिक्त वादळाच्या प्रभावामुळे 1 हजार 454 झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटनादेखील घडल्या. यापैकी, 798 फांद्या या खासगी परिसरातील झाडांच्या होत्या. तर उर्वरित 666 फांद्या या सार्वजनिक परिसरातील होत्या. ही झाडे अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सार्वजनिक परिसरात पडली होती. ज्यामुळे वाहतुकीस अडथळा होण्याची शक्यता होती. मात्र पालिकेच्या उद्यान विभागाने अक्षरशः दिवसरात्र पद्धतीने नियोजन व कार्यवाही करून ही पडलेली झाडे अल्पावधीत हटवून रस्ते मोकळे केले आहेत.
निसर्ग वादळापेक्षा प्रचंड मोठा फटका
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे 3 जून ते 6 जून या कालावधीत 323 झाडे पडली होती. ज्यापैकी 221 झाडे ही खासगी परिसरातील होती. तर 102 झाडे ही सार्वजनिक परिसरातील होती. तर त्यानंतर 5 व 6 ऑगस्ट या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान देखील पालिका क्षेत्रात वेगवान वाऱयांमुळे 355 झाडे पडली होती. ज्यापैकी 179 झाडे ही खासगी परिसरातील होती. तर 176 झाडे ही सार्वजनिक परिसरातील होती. या पडलेल्या झाडांमध्ये देखील विदेशी झाडांचे प्रमाणे अधिक होते.
कोसळलेली 70 टक्के झाडे विदेशी
पालिका क्षेत्रातील खासगी परिसरातील 504 व सार्वजनिक परिसरातील 308; यानुसार एकूण 812 झाडे पडली. यापैकी सुमारे 70 टक्के पडलेली झाडे ही विदेशी प्रजातींची आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोनमोहर, गुलमोहर, गुळभेंडी, रेन-ट्री, रॉयल पाम आदी झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. त्यामुळे विदेशी कमकुवत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिका क्षेत्रात यापुढे वृक्षारोपण करताना प्राधान्याने स्थानिक प्रजातींचीच झाडे लावणे गरजेचे असल्याचे समोर आले आहे.






























































