पिस्तूल बाळगणाऱ्या संगमनेरातील तिघांना अटक

परदेशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या संगमनेरातील तिघांना पालघर जिह्यातील तलासरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून ‘मेड इन यूएस’ असा शिक्का असलेले पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे सापडली. दरम्यान, अटक करण्यात आलेले आरोपी संगमनेरातील गोवंशहत्या आणि तस्करीत सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

इरफान युनूस शेख (वय 25), मुसा हारुण शेख (वय 28), समित लाजरस खरात (वय 30, सर्व रा. कुरण रोड, ता. संगमनेर) अशी पकडलेल्या तिघांची नावे आहेत. तलासरीचे सहायक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र दुंदू सातवी यांनी फिर्याद दिली आहे.

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उधवा-कोदाड रस्त्यावर पालघर जिह्यातील तलासरी पोलिसांकडून नाकाबंदी सुरू होती. यावेळी गुजरातला जाणाऱ्या एका पिकअपची पोलिसांनी तपासणी केली असता, एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. पोलिसांनी गाडीतील तिघांनाही ताब्यात घेतले असून, पिकअप गाडीसह सुमारे आठ लाख 20 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, अटक केलेले तीनही आरोपी संगमनेर तालुक्यातील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. यासंदर्भात संगमनेरच्या बजरंग दलाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन दिले असून, हे आरोपी गोवंशहत्या व गोवंशमांसतस्करी करणारे आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. ‘पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी केली तर कुरण येथे अवैध शस्त्रे सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी,’ अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाचे सचिन कानकाटे यांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.