पुण्यात माथाडी गुंडांची दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन ।

पुण्यातील बाजारपेठेमध्ये, मॉलमध्ये माथाडींच्या नावाने फिरणाऱ्या गुंडांची दहशत असून सामान एक कामगार उचलतो, तर पैसे दुसरेच जबरदस्तीने घेऊन जातो. मुंबईपेक्षा पुण्यातील स्थिती गंभीर झाली असून पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या गुंडांमुळे कधी काय होईल सांगता येत नाही, अशी चिंता आमदारांनी विधान परिषदेत व्यक्त केली. यावर उत्तर देताना गुंडगिरी करणाऱ्या माथाडींची तक्रार करण्यासाठी दोन महिन्यांत ऑनलाइन पोर्टल सुरू करून त्यावरून गुन्हे दाखल केले जातील, अशी घोषणा कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केली.

शिवसेनेच्या उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, घरातील सामान पॅकर्स ऍण्ड मूव्हर्सकडून हलवत असताना काहीजण माथाडी कामगारांच्या नावाने जबरदस्तीने पैसे घेतात. या माथाडीवाल्यांकडे पिस्तूल आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय नागरिक पैसे देतात. पिंपरीत मॉलमध्ये या कारणावरून खून झाला. दहशत निर्माण करून ते पैसे गोळा करत आहेत. यामध्ये काही पोलीसही सहभागी असल्याचेही डॉ. गोऱहे यांनी सांगितले. विधान परिषदेत कलम ९७ अन्वये माथाडी कायद्याला ५० वर्षे पूर्ण झाली यावर अल्पकालीन चर्चा करण्यात आली. मुंबईपेक्षा माथाडींचा दंगा, त्यांना आवरा. पूर्वी गुंड लोक खंडणी मागायचे, आता माथाडीच्या नावाने खंडणीखोरी सुरू झाली आहे. मुंबईपेक्षा पुण्यात गुलटेकडी मार्केट, चाकण एमआयडीसीमध्ये माथाडीतील गुंडांचा दंगा वाढल्याचे सांगतानाच कायदा सक्षम करण्यासाठी समिती करा अशी मागणी आमदार नरेंद्र पाटील यांनी केली.