हेल्मेट न घातल्यामुळे ट्रकचालकाला हजार रुपयांचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दुचाकी वाहन चालकताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. मात्र हेल्मेट न घातल्यामुळे चक्क ट्रक चालकाकडून हजार रुपयांचा दंड आकारण्याचा प्रकार ओडिशात घडला आहे.

झाले असे की, गंजम जिह्यातील प्रमोद कुमार हे परिवहन विभागाच्या कार्यालयात वाहन परमिट नूतनीकरणासाठी गेले होते. त्यावेळी तुमच्या गाडीच्या नावे एक चलान भरायचा राहिला आहे असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर चलान का आकारण्यात आले अशी विचारणा प्रमोद यांनी केली. त्यावर हेल्मेट न घालता वाहन चालवल्यामुळे  दंड आकारण्याचे कारण अधिकाऱयांनी सांगितले. धक्कादायक बाब ही होती की ट्रक चालकताना हेल्मेट न घातल्यामुळे त्यांना दंड आकारण्यात आला.

परिवहन विभागाच्या अधिकाऱयांना ही बाब सांगूनही त्यांनी प्रमोद यांचे काहीच ऐकून घेतले नाही. अखेर दंड भरत त्यांनी परवान्याचे नूतनीकरण केले. सोशल मीडियावर ही घटना व्हायरल झाल्यावर त्यावर युजरच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘हिंदुस्थानात काहीही होऊ शकते. एकदा तर माझी कार पार्किंगमध्ये असताना मला ओव्हर स्पीडचे चलान आले होते’ अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. ‘आता ट्रक चालवताना पण हेल्मेट घालायचं का’ असा प्रश्न दुसऱया युजरने विचारला आहे.