तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत हिवरे बाजार राज्यात प्रथम

103

सामना प्रतिनिधी । नगर

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सन २०१६-१७ या वर्षातील राज्यस्तरीय २५ लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायतीने पटकावला. संभाजीनगर येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिभाऊ बागडे अध्यक्ष विधानसभा, बबनराव लोणीकर मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, डॉ.भागवत कराड अध्यक्ष महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ, देवयानी डोणगावकर अध्यक्षा जि. प. संभाजीनगर, श्यामलाल गोयल अप्पर मुख्य सचिव पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, पुरुषोत्तम भापकर विभागीय आयुक्त संभाजीनगर, अभय महाजन उपसचिव पाणीपुरवठा व स्वच्छता, पवनीत कौर मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजीनगर यांच्या प्रमुख उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात आला.

गेली ३० वर्षे हिवरे बाजार गाव सर्वांगीण विकासाबरोबरच स्वच्छतेबाबत जागरूक असलेले गाव असून त्यातील सातत्य हे खरे या गावाचे वैशिट्य आहे. यापूर्वी सन २००६–०७ यावर्षी सुद्धा राज्यातील प्रथम पुरस्कार गावाला मिळाला होता. तसेच २००० साली जिल्ह्याचा प्रथम पुरस्कार मिळाला होता. स्वच्छतेचा आलेख नेहमीच उंचावत गेला त्यामुळेच आज पुन्हा एकदा राज्यात प्रथम येण्याचा मान या गावाने पटकाविला.

व्दितीय २० लाखाचा पुरस्कार सातारा जिल्ह्यातील माण्याची वाडी व नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी यांना विभागून देण्यात आला.तसेच तृतीय क्रमाकाचा १५ लाखाचा पुरस्कार रायगड जिल्ह्यातील घाटाव व चंद्रपूर जिल्ह्यातील राजगड यांना विभागून देण्यात आला.

पुरस्कार सोहळ्यासाठी हिवरे बाजार गावातील सुमारे १३५ महिला व ७० पुरुष उपस्थित होते. पोपटराव पवार व ग्रामस्थांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

आपली प्रतिक्रिया द्या