अमित शहांचा प्रोफाईल फोटो ट्विटरने हटवून पुन्हा लावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा ट्विटर प्रोफाईलवरील फोटो ट्विटरने गुरुवारी हटवला होता. ANI या वृत्तसंस्थेने ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. या फोटोवर अज्ञात व्यक्तीने कॉपीराईट अधिकार सांगितला होता. यामुळे हा फोटो हटवण्यात आल्याचे ट्विटरने सांगितले असं ANI ने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अमित शहा यांचा डीपीवरील फोटो हटवल्याने त्याबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा झडायला सुरुवात झाली. यानंतर ट्विटरने फोटो हटवण्याबाबत त्यांचे म्हणणे स्पष्ट केले. हा फोटो हटवल्यानंतर तो ट्विटरने पुन्हा लावल्याचे ANI च्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्विटरवरील व्हेरीफाईड अकाऊंट असलेल्या संस्था अथवा व्यक्तीचा प्रोफाईल फोटो हटवला जाण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वी BCCI च्या अधिकृत हँडलवरील प्रोफाईल फोटो देखील हटवण्यात आला होता. त्यावेळी देखील कॉपीराईटच्या तक्रारीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्विटरने सांगितलं होतं.