
अलिशान मोटार दुरूस्तीचा बहाणा करीत व्यावसायिकाला बोलावून घेत त्याचे अपहरण करीत पाच लाखांची खंडणी मागून दीड लाख रूपये उकळणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांनी अटक केली. ही घटना 22 ऑक्टोबरला रात्री साडेदहाच्या सुमारास केसनंद थेउर रस्त्यावर घडली.
राहूल मोताळे वय 21, सुरज जांभळे (18) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशाल जगदाळे हा पसार झाला आहे. या प्रकरणी राजीव लक्ष्मणप्रसाद सिंग (36 रा. केसनंद) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरोपी राहूल हा राजीव यांच्या तोंडओळखीचा आहे. त्याने राजीवला अलिशान मोटार दुरूस्तीला घेउन येण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपी सुरज आणि विशालने राजीव यांच्या डोळ्याला पट्टी बांधली. त्यांना जबदरस्तीने मोटारीत बसवून 5 लाखांची खंडणी मागितली. तडजोडीअंती दीड लाख रूपये देण्याचे ठरले.
त्यानुसार राजीवने त्यांच्या भावाला दीड लाख रूपये घेउन वाडेबोल्हाई परिसरात बोलाविले. आरोपींनी पैसे घेतल्यानंतर राजीवला सोडून दिले. जर ही माहिती पोलिसांना दिल्यास मुलीला पळवून नेण्याची धमकी दिली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.





























































