New Zealand मशिद हल्ल्यातून बचावलेले 2 क्रिकेटपटू अडकले विवाह बंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ढाका

न्यूझीलंडमध्ये मशिदीवर झालेल्या हल्ल्यात बचावलेले दोन बांग्लादेशी खेळाडू विवाह बंधनात अडकले आहेत. मेहदी हसन आणि मुस्तफिजूर रहमान अशी या खेळाडूंची नावं आहेत. 15 मार्च रोजी ख्राईस्टचर्च येथील मस्जिद-अल- नूरमध्ये गोळीबार झाला त्यावेळी बांग्लादेशचा संघ आणि कोचिंग स्टाफ मशिदीच्या आवारातच होता. या दहशतवादी हल्ल्यात 5 बांग्लादेशी नागरिकांसह 50 जणांचा मृत्यू झाला होता. मात्र दैव बलवत्तर होते म्हणून सर्व खेळाडू सुखरूप बचावले.

न्यूझीलंडमध्ये ख्राईस्टचर्च मशिदीमध्ये झालेल्या गोळाबारानंतर बांग्लादेश आणि न्यूझीलंडमधे होणारा तिसरा कसोटी सामना रद्द करण्यात आला आणि बांग्लादेशचा संघ मायदेशी परतला. हल्ल्याच्या धक्क्यातून सावरत नाही तोच या संघातील दोन खेळाडूंनी आठवडाभरातच लग्न उरकून घेतले. बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू मेहदी हसन शुक्रवारी राबिया अख्तर या प्रेयसीसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. मेहदी आणि राबिया यांच्यात 6 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तर दुसरीकडे वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान देखील शुक्रवारीच सामीया परवीन शिमू सोबत बोहल्यावर चढला. “आम्ही लग्नासाठी योग्य वेळेची वाट बघत होतो आणि ती वेळ आता आल्याने विवाह सोहळा उरकला. तसेच लग्नामुळे न्यूझीलंडमधील दहशतवादी हल्ल्याच्या धक्क्यातून बाहेर पडण्यास देखील मदत होईल” असे या खेळाडूंच्या कुटुंबीयांनी सांगितले. मुस्तफिजूर हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन संघाचादेखील खेळाडू आहे.