पाथर्डी तालुक्यात तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने करंजी गावावर शोककळा पसरली आहे.

करंजी येथील संदीप दत्तात्रय अकोलकर (वय 28) व बाप्पु दत्तात्रय अकोलकर (वय 22) हे दोघे मेंढ्या घेऊन मुखेकर वस्तीजवळ असलेल्या बोरूडेच्या पाझर तलावाजवळ गेले होते. मेंढ्या चरून झाल्यानंतर त्यांनी मेंढ्या पाणी पिण्यासाठी पाझर तलावाजवळ आणल्या. मेंढ्यानी पाणी प्यायल्यानंतर नेहमीप्रमाणे या मेंढ्याना धुण्यास सुरवात केली असताना संदीप दत्तात्रय याचा पाय घसरून तो पाण्यात पडला. तर त्याला वाचवण्यासाठी बापू गेला असता त्याचाही तोल गेला. त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. मेंढ्या घरी परतल्या, मात्र दोघेही भाऊ न आल्याने त्यांच्या घरच्यांना संशय आला. त्यांचे नातेवाईक व आजूबाजूची मंडळी तलावाजवळ आली व त्यातील काही तरुणांनी पाण्यात उड्या मारून दोघांचेही मृतदेह बाहेर काढले.

पाथर्डी येथे शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी उशिरा या दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप अकोलकर याला एक चार वर्षाचा मुलगा असून बापू अविवाहित आहे. या घटनेने करंजी गावावर शोककळा पसरली आहे.