
सामना ऑनलाईन, ठाणे
ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटिस पुलाच्या तीव्र उतारावर आज दोन एसटी बसेसची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की पुढच्या एसटीतील एक प्रवासी चालकासमोरील काचेतून थेट रस्त्यावर फेकला गेला. या दुर्घटनेत एकूण १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातग्रस्त बसने सॅटिस पुलाच्या सिमेंटच्या कठडय़ाला धडक दिल्यानंतर हा भाग खालून जाणाऱया वाहनांवर सुदैवाने कोसळला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. तीव्र उतार आणि पावसामुळे निसरडा झालेल्या या रस्त्यावर बसचे ब्रेक नीट न लागल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ठाण्यावरून शहापूरकडे जाणारी भरधाव एसटी सॅटिस पुलावरून जांभळी नाक्याच्या दिशेने उतरत असताना चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले. चालकाने सॅटिसच्या कठडय़ाला घासून बस उभी करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पाठीमागून ठाणे-भिवंडी ही एसटी वेगाने येत होती. पुढे अचानक उभी असलेली बस दिसताच या एसटीच्या चालकाने ब्रेक दाबले, परंतु त्याआधीच ही एसटी पुढच्या एसटीवर जाऊन आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की पुढच्या बसमधील प्रवासी चालकासमोरील काचेतून बाहेर फेकला गेला, परंतु तो सुदैवाने बचावला. दोन्ही बस प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या. या अपघातामुळे प्रवासी एकमेकांवर आदळले. अनेकांच्या डोक्याला आसनांच्या लोखंडी रॉडचा दणका बसला. नेमके काय झाले हे क्षणभर कोणालाच कळले नाही. ‘वाचवा… वाचवा…’ असा आरडाओरडा प्रवाशांनी केला.
सिव्हिल रुग्णालयात उपचार
या घटनेनंतर शिवसेनेचे नगरसेवक सुधीर कोकाटे, विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, विभागप्रमुख कमलेश चव्हाण, युवासेनेचे प्रथमेश बनकर यांच्यासह आजूबाजूचे वाहनचालक व पादचाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्या मच्छिंद्र सकपाळ (३७), गणेश महाढोलकर (४०), निमिशा कागळे (१८), पार्थ मेहता (१५), इराम अन्सारी (१८), करुण म्हस्के (२३), अर्चना केसर (५५), रणजीत शिकारे (२२), वेदांती कारसले (१८), अर्थक मोरे (१६), नितीन प्रसाद (२३), प्रथम वाडिया (१६) यांच्यासह बारा प्रवाशांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने कोणालाही गंभीर जखमा झाल्या नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यापैकी सात जणांना उपचारानंतर सायंकाळी घरी सोडण्यात आले.
केगमर्यादा असूनही बस दामटवण्याचा अट्टहास
सॅटिस पुलाचा उतार तीव्र असून येथे मार्गदर्शक फलकांवर ताशी ४० किमी वेगमर्यादा दर्शवण्यात आली आहे, मात्र तरीही टीएमटी, एसटीचे चालक बस वेगाने दामटवण्याचा अट्टहास करतात, उतारावरील डांबरी रस्ता गुळगुळीत असून या ठिकाणी पावसात गाडय़ांचे ब्रेकच लागत नसल्याचे खुद्द बसचालकांनीच सांगितले. आतापर्यंत याच स्पॉटवर जवळपास १० ते १२ केळा किरकोळ अपघात झाले आहेत.


























































