
दारुच्या नशेत तर्राट असताना मित्रासोबत झालेल्या किरकोळ वादानंतर एका तरुणाने त्याच्या मित्राला बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या मित्राचा मृत्यू झाल्याची घटना कोंढवा भागात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोसिफ साजिद बागवान (22, येवलेवाडी, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, सुरेश राजू कसोटिया (32, रा. कोंढवा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत विनोद कसोटीया (रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (दि.13) रात्री साडेसातच्या सुमारास खडी मशीन चौकाजवळील मोकळ्या मैदानात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागवान आणि कसोटिया दोघे मित्र आहेत. दोघेही मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करतात. बुधवारी रात्री दोघेजण खडी मशीन चौकाजवळील मैदानात दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यांनतर बागवानने कसोटिया याला मारहाण केली. कसोटीया याने देखील मारहाण केल्याने दोघांमध्ये चांगलाच वाद झाला. बागवान याने बांबूने मारहाण केल्याने कसोटीया गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शुक्रवारी (दि15 ) रात्री कसोटीया याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी बागवान याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय मोगले करत आहेत.


























































