अंधेरीत एसआरए इमारतीला लागलेल्या आगीत मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अंधेरीत कदमनगर येथे एका एसआरए इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आज रात्री 8.30च्या सुमारास आग लागली. या आगीत विकी शर्मा (23) आणि सागर शर्मा (6) या मामा-भाच्याचा होरपळून मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन तिघांची सुखरूप सुटका केली. मात्र या घटनेत एक जण अजूनही बेपत्ता असून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. घरात छटपूजा सुरू होती. यादरम्यान गॅसगळती झाल्याने पूजेसाठी लावलेल्या दिव्यांमुळे स्फोट झाला. विकी शर्मा याचा भाऊ दीपक शर्मा याने आई-वडिलांना खेचून बाहेर काढले, पण विकी आणि सागर यांना बाहेर काढता आले नाही. त्यामुळे होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दल पोहोचण्यास विलंब
अरुंद रस्ते आणि दाट लोकवस्ती यामुळे या ठिकाणी पोहोचण्यास अग्निशमन दलाच्या गाडीला विलंब झाला. गॅसचा स्फोट झाल्यामुळे घरातील सामान जळून खाक झाले. शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली अशी माहिती आंबोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.