मध्य प्रदेशमध्ये साडे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन, भोपाळ

बलात्काराच्या दोन घटनांमुळे मध्य प्रदेश हादरले असून एका मुलीचे वय अवघे साडे चार वर्षं आहे. तर दुसर्‍या मुलीचे वय १५ आहे. कन्या भोज या प्रथेच्या बहाण्याने आरोपीने या साडे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले. तर दुसरीकडे १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. या दोन्ही प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

रायसेन जिल्ह्यापासून ८० किमी दूर बरेली भागात कन्याभोज या प्रथेच्या बहाण्याने एका तरुणाने साडे चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. ही घटना आठ दिवसांपूर्वी झाली होती, आरोपी बलात्काराच्या उद्देशाने परत या मुलीला नेण्यासाठी आला असता पीडित मुलीने त्याला ओळखले आणि लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

दुसरी घटनाही बरेलीची असून १५ वर्षांच्या मुलीचे तिच्याच मैत्रीणीच्या भावाने अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या मैत्रीणीच्या भावावर आणि त्याच्या साथीदारांवर आरोपपत्र दाखले केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या मैत्रीणीचा भाऊ संजय सिंह धाकड आणि त्याचे नातेवाईक आकाश सिंह धाकड यांनी चार दिवसांपूर्वी अल्पवयीन तरुणीला दुचाकीवर जबरदस्ती नेऊन जंगलात तिच्यावर अत्याचार केले. सध्या पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे.