कर्जत आंबिवली येथे दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कर्जत

कर्जत तालुक्यातील आंबिवली येथे शेतकऱ्याने बनविलेल्या शेत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला.त्यांच्या सोबत असलेली आणखी दोन शाळकरी मुले मात्र वाचली आहेत.

कर्जत तालुक्यातील आंबिवली गावातील चार शाळकरी मुले आज १ जुलै रोजी दुपारी पेठ किल्ल्याचे रस्त्यावर असलेल्या तलावात पोहायला गेली. तेथील एका फार्म हाऊस मालकाने शेत तलाव खोदला आहे. शासनाच्या शेत तलाव योजनेतील असून त्या तलावातील पाणी उन्हाळ्यात साठून राहावे म्हणून त्यात प्लास्टिक आच्छादन घातलेले असते. आंबिवली गावातील चार शाळकरी मुले तेथील रखवालदाराची नजर चुकवून दुपारी २ च्या सुमारास तलावात उतरली आणि त्यातील दोघे पाण्याचा अंदाज आला नसल्याने बुडाली.

साडेतीनच्या सुमारास त्या भागातून जाणाऱ्या काही स्थानिकांना शेत तलावाच्या पाण्यावर एका लहान मुलाचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ तिकडे धाव घेतली आणि फार्म हाऊसमधील मजुरांच्या मदतीने प्रदीप अशोक पिंपरकर या आठवी इयत्तेत शिकत असलेल्या मुलाला बाहेर काढले. त्यानंतर लगेच १० मध्ये शिकत असलेल्या अक्षय प्रकाश खेडेकर या शाळकरी मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगला. त्या दोन्ही बालकांचे मृतदेह साधारण साडे चार वाजता बाहेर काढण्यात आले. या मृतदेहांचे विच्छेदन करण्यासाठी कशेळे येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.