सुरक्षा दलाच्या जवानांसोबत चकमक, पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । श्रीनगर

जम्मू-कश्मीरच्या पुलवामा जिह्यातील अवंतीपुराच्या ब्राव बंदिना परिसरात शुक्रवारी सुरक्षा दलासमवेत झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. लश्कर-ए-तोएबाशी संबंधित हे दहशतवादी पुलवामामध्येच राहत होते. ज्या घरात दहशतवादी लपले होते त्या घराला चकमकीदरम्यान आग लागली.

ब्राव बंदिना परिसरात दहशतवादी लपल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी शुक्रवारी या परिसरात शोधमोहीम राबवली. याचदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्याला चोख प्रत्युत्तर देताना जवानांनी इरफान अमीन डिगो आणि तसद्दक अहमद शाह या दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. परिसरात आणखी दहशतवादी लपल्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी शोधमोहीम सुरूच ठेवली आहे.

रेल्वे, इंटरनेट सेवा बंद

चकमक उडालेल्या परिसरातील लोकांच्या सुरक्षेसाठी तेथील इंटरनेट सेवा तसेच जम्मू-कश्मीरच्या दक्षिणेकडील इन्ट्रा कश्मीर रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे.