
सामना ऑनलाईन, संभाजीनगर
दिवाळी सणानिमित्त बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या भावाची दुचाकी माथेफिरूने पेटवून दिल्याने ती जळून खाक झाली आहे. ही घटना सिडको वाळूज महानगर-1 मधील गुरू-दक्षिणा अपार्टमेंटमध्ये घडली आहे. माथेफिरूने लावलेल्या आगीमध्ये दोन बाईक जळून खाक झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाईक जाळण्याचे सत्र थांबले होते. मात्र हे प्रकार आता पुन्हा वाढीस लागल्याचं दिसायला लागलं आहे.
बहिणीला भेटण्यासाठी वैजापूर तालुक्यातील जातेगाव टेंभी येथून आप्पासाहेब साहेबराव गायकवाड हे मंगळवारी संभाजीनगरात आले होते. ते बहिणीकडे मुक्कामी करणार असल्याने त्यांनी त्यांची बाईक आपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने ही बाईक पेटवून दिली. पार्किंगमध्ये आग लागल्याचे समजताच रहिवाशांनी खाली येऊन दुचाकी विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत गायकवाड यांच्याबाईकसह शेजारची बाईकही जळून खाक झाली होती. पोलिसांनी बुधवारी सकाळी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.

































































