>> अभिजित कुळकर्णी, योगशिक्षक, भारतीय योग मंदिर
प्राणायामच्या वेळी श्वास रोखून ठेवताना काही क्रिया कराव्या लागतात. या क्रियांना बंध म्हणतात. यापैकी जालंधर बंध आपण गेल्या लेखात पाहिला. या लेखात आपण अन्य बंधांची आणि प्राणायामची माहिती करून घेऊ.
मूलबंध
आपले जननेंद्रिय आणि गुदद्वार यांना थोडे आकुंचित करावे. त्यामुळे मूलाधार चक्रावर प्रभाव पडून ओटीपोटाच्या भागातील किडनी, मूत्राशय, गर्भाशय आदी अवयवांवर चांगला परिणाम होतो. मन शांत आणि एकाग्र होते. कोणताही प्राणायाम करताना जालंधर बंध आणि मूलबंध हे करावेच लागतात.
योगशास्त्र्ाात सप्तचक्रांचा उल्लेख येतो. या सप्तचक्रांतीतले अत्यंत महत्त्वाचे चक्र म्हणजे मूलाधार चक्र. गुदद्वार आणि जननेंद्रिय यांना जोडणाऱया शिवणीच्या थोडय़ा वरच्या भागात हे चक्र असते असे म्हटले जाते. आपले मनोव्यापार या चक्राकडूनच नियंत्रित केले जातात. गणपती अथर्वशीर्षात गणपतीचे वर्णन करताना म्हटले आहे, ‘मूलाधारस्थितो।़सि नित्यं।’ अर्थात इंद्रिय गणांना नियंत्रित करणारा गणाधीश हा नित्य मूलाधार चक्रामध्ये स्थिर असतो. गणपती ही मूलाधार चक्राची देवता आहे.
उड्डियान बंध
हा बंध केवळ बाह्य कुंभक वा बाह्य प्राणायाम करतानाच वापरला जातो. पूर्णपणे उच्छ्वास केल्यावर आपले पोट आतमध्ये खेचून घेण्याच्या क्रियेला उड्डियान बंध असे म्हणतात. पोट इतके आतमध्ये खेचावे की, जवळपास ते आपल्या पाठीला चिकटले पाहिजे. याच वेळी आपले श्वासपटल हेही वर खेचून ठेवावे. त्यामुळे आपल्या पोटाचा एखाद्या गुहेसारखा आकार निर्माण होतो.
बाह्य कुंभक / बाह्य प्राणायाम
पद्मासनात स्थिर बसावे. प्रथम दीर्घ श्वसन करून श्वास भरून घ्यावा. नंतर सावकाशपणे उच्छ्वास करावा. पूर्णपणे उच्छवास केल्यानंतर जालंधर बंध, मूलबंध आणि उड्डियान बंध हे तिन्ही बंध एकत्र करावेत. श्वास बाहेर रोखून ठेवावा. काही वेळेनंतर सावकाशपणे तिन्ही बंध सोडून द्यावेत आणि भरपूर श्वास भरून घ्यावा. तीन ते चार वेळा दीर्घ श्वसन करावे. या प्राणायामात तीनही बंधांचा प्रयोग होत असल्याने याला त्रिबंध असेही म्हणतात.