
जयगड समुद्रात बुडालेल्या नावेद 2 नौकेचा अद्यापही शोध लागलेला नाही. या प्रकरणाकडे जिंदल कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खुद्ध संचालकांनीच एक पत्र दिले आहे. या पत्रात एका नौकने समुद्रात अपघात झाल्याचे बोट बुडाल्याची माहिती दिल्याचे स्पष्ट असल्याचा गौप्यस्फोट उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केला. मच्छिमार नौका बुडाल्याच्या प्रकरणाची पुन्हा नव्याने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार असल्याचे सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
26 ऑक्टोबर रोजी नावेद 2 ही मच्छिमार नौका मासेमारी करण्यासाठी गेली असता बुडाली. या नौकेत सहा खलाशी होते. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतर पाचजण बेपत्ता आहे. ही नौका बुडाली कशी, समुद्रात अपघात झाला का असे प्रश्न उपस्थित केले जात असून तपासाला दिशा मिळत नसल्याने मच्छिमार संतप्त झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, 15 दिवसांपूर्वी एक मच्छिमार नौका बुडाली. अजूनही त्या नौकेचे अवशेष आणि बेपत्ता खलाशांचे मृतदेह सापडले नाहीत. तटरक्षक दलाने 72 तास शोधमोहिम राबवली. त्यानंतर आम्ही विनंती केल्यानंतर आणखी 72 तास त्यांनी शोध मोहिम वाढवली. मात्र या मोहिमेत त्यांना काही सापडले नाही. पोलीसांनी फिश फायंडर आणि जीपीएस यंत्रणा ताब्यात घेतली आहे. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. आणखी एक मृतदेह तरंगताना दिसला मग तो ताब्यात का घेतला नाही असा प्रश्न उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित केला.
एका नौकेने बोट बुडाल्याची माहिती दिली
सहाय्यक संचालकांनी एक पत्र दिले आहे. त्या पत्रात त्यांना एका नौकेने बोट बुडाल्याची माहिती दिली होती. याचा अर्थ नौकेचा अपघात झाला किंवा नौकेचे काय झाले हे काही लोकांनी पाहिले आहे. जे पाहणारे आहेत ते पुढे येत नाहीत असे आता म्हणावे लागतेय. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा शोधमोहिम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमध्ये जिंदल कंपनीचे काही दोष आहेत का, की नैसर्गिकरित्या अपघात झाला आहे याची चौकशी केली जाणार आहे अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.




























































