
मातोश्री ग्रामसमृध्दी शेत, पाणंद रस्ते या योजनेबाबत आज रत्नागिरीतील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा घेण्यात आला. शेत, पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरिता आवश्यक असणाऱ्या साधनांची ने-आण करण्याकरिता उपयोगात येतात. प्रमाणित दर्जाचे शेत, पाणंद रस्ते तयार करण्याकरिता मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना शासनाने आणली आहे, असे मत त्यांनी मांडले.
यावेळी सामंत म्हणाले की, या योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावाला लाभ देणे शक्य आहे. त्यामुळे त्याबाबतचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत. याबाबत आपण 17 फेब्रुवारी रोजी आढावा घेणार असून संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करण्याच्या दृष्टिने आवश्यक ती कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी इंदूराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) अमिता तळेकर, रत्नागिरीचे प्रांताधिकारी विकास सुर्यंवशी, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप आदि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


























































