
‘छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच जात-पात मानली नाही. मी स्वतःला कधीच मराठा म्हणून समजून घेतलं नाही. आरक्षणानं माणसं दुरावताहेत. खरंतर जातीपेक्षा गुणवत्तेलाच प्राधान्य दिले पाहिजे. शिवरायांनी दिलेली सर्वधर्म समभावाची शिकवण आजही अमलात आणली पाहिजे,’ असे परखड मत भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
सातारा पालिकेत पत्रकारांनी आरक्षणाच्या मुद्यावरून उदयनराजेंशी संवाद साधला. ‘मराठा समाजात राजकारण नसतं तर मागेच आरक्षण मिळालं असतं. आंदोलन करणाऱया मराठा संघटना आणि कार्यकर्त्यांना मी आपलं उद्दिष्ट काय असं विचारलं तर कुणीही बोलत नाही. मराठा संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘लहानपणी गोटय़ा, विटी दांडू खेळायचो तेव्हा तुम्ही जात बघत होतात का? ह्या आरक्षणामुळे मराठा समाजात दुरावा निर्माण झाल्याचे दिसते. लोकं एकमेकांशी बोलायचे बंद झाले. अमेरिकेत वर्णभेदातून उद्रेक झाला तसा या आरक्षणामुळे आपल्याकडे होईल. सगळ्याच गोष्टीचे राजकारण करायचे नसते,’ असे ते म्हणाले.
आर्थिक स्तरावर आरक्षणाचा विचार करा
‘जात-पात ही लोकांनी स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केली आहे. इतर जातींचं आरक्षण काढून घेऊ नका पण आर्थिक स्तरावर केंद्र सरकार व अन्य राज्यांनी आरक्षण लागू केले आहे. त्या पर्यायाचाही विचार करायला काय हरकत आहे,’ असा सवालही उदयनराजे यांनी यावेळी उपस्थित केला.


























































