दुर्गम भागात लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

नाशिक जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्यप्रकारे मिळतील याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. लसीकरणानंतरही नियमांचे काटेकोर पालन करावे यासाठी जागरूकता निर्माण करण्यात यावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे शुक्रवारी आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले की, शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात; परंतु ग्रामीण, विशेषतः दुर्गम भागातील नागरिकांना अशा सुविधा मिळणे आवश्यक आहे. कोविडचा धोका पुन्हा वाढला आहे. मात्र, यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा. जिह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबविले असून, त्यात यापुढेही सातत्य ठेवण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धडगाव आणि मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. तेथील नागरिकांशी संवाद साधला. दुर्गम भागातील माझ्या माताभगिनी आणि बांधवाना कोरोना लसीकरणाची चांगली सुविधा मिळते का हे पाहण्यासाठी मोलगी येथून लसीकरण केंद्राच्या भेटीला सुरुवात करीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. लस घेताना कोणतीही भीती मनात बाळगू नका. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराचे पालन सुरू ठेवा. आपण स्वतः लस घेतली असून, त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याने घाबरू नका, अशा शब्दात त्यांनी नागरिकांना विश्वास दिला. लसीचा साठा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था व शीतपेटीसाठी आवश्यक विद्युत व्यवस्थेविषयी माहिती घेतली. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लसीकरण प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या