
सुनील उंबरे, पंढरपूर
पंढरीची पायी वारी अनेकांनी अनुभवली आहे पण पंढरीची आकाशवारी फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनुभवली आहे. त्यांनी अनुभवलेली आकाशवारी ही प्रत्येक वारकऱ्याला अनुभवता याची यासाठी उद्धव ठाकरे यांनी टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन येत्या कार्तिकी वारीला पंढरपूरमध्ये भरविणार असल्याची माहिती शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी पत्रकारांना दिली. पंढरपूरच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. पंढरीच्या या वारीचे आकर्षण प्रत्येकालाच आहे, तसे ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देखील होते. मात्र त्यांनी पायी वारी अनुभवण्यापेक्षा पायी चालणारा हा सोहळा आकाशातून कसा अनुभवता येईल या दृष्टिकोनातून ऐतिहासिक असे काम केले आहे. वारीची ओढ, वारकऱ्यांविषयी असलेली आत्मीयता आणि संतांच्या चरणी नतमस्तक होण्याच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांनी हेलिकॉप्टरच्या साहाय्याने आकाशवारी पूर्ण करण्याचा निश्चय केला. मोठ्या धाडसाने आणि कौशल्याने उद्धव ठाकरे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून वारीचा अनुपम अन नेत्रदीपक असा सोहळा टिपला.
अगदी देहू-आळंदी पासून ते पंढरपूरपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. पालखीच्या या मार्गावरील प्रत्येक घटना ठाकरे यांनी खूप कष्ट आणि धोका पत्करून टिपल्या आहेत. आकाशातून दिसणारी पालखी सोहळ्याची विहंगम दृश्य उद्धव ठाकरे यांनी आपल्या ‘पाहावा विठ्ठल’ या छायाचित्र पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर आणली आहेत. छायाचित्रांच्या या पुस्तकाला उदंड प्रतिसाद मिळाला. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची छायाचित्रे काढली होती. त्याचे प्रदर्शन राज्यभर भरविण्यात आले. तसाच प्रयोग ‘पाहावा विठ्ठल’ या पुस्तकाच्या बाबतीत आहे. या पुस्तकातील काही निवडक छायाचित्रे वारकऱ्यांना सहजतेने पाहता यावीत त्याचा आनंद घेता यावा, विठुरायाची वारी आकाशातून कशी दिसते, हे वारकऱ्यांना अनुभवता यावे या उद्देशाने येत्या कार्तिकीवारीमध्ये पंढरपूरमध्ये छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे. यामुळे वारकऱ्यांना पायी वारी तर घडते आहेच या शिवाय आकाशवारी घडावी हा या मागचा उद्देश असल्याचे बांदेकर यांनी स्पष्ट केले.





























































