थांयलंडमध्ये अफाट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांनी केला गौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

चार किलोमीटरची थाम लुआंग गुहा…त्यातील अडीच किलोमीटरचा भाग सखल…बाहेर मुसळधार पाऊस…पावसाचे पाणी वेगाने गुहेत शिरत होते. गुहेत १२ मुले अडकली होती. बाहेर पडणे कठीणच. अशा स्थितीत त्यांना बाहेर काढणे हे कोणत्याही यंत्रणेला आव्हानच. पण महाराष्ट्राचे किर्लोस्कर बंधू थायलंडच्या हाकेसरशी मदतीला धावून गेले. किर्लोस्करांच्या पंपांनी गुहेतील पाण्याचा उपसा यशस्वीरीत्या केल्याने सर्व १२ मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

किर्लोस्कर समूहाचे अध्यक्ष संजय किर्लोस्कर आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही चित्तथरारक हकीकत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सांगितली तेव्हा प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलली. किर्लोस्कर यांच्यासह कंपनीचे विपणन प्रमुख विकास अग्रवाल, मनुष्यबळ विकास प्रमुख रवींद्र बिराजदार आणि महाव्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांचा ‘मातोश्री’ निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज विशेष सत्कार करण्यात आला.

कुलकर्णी यांनी यावेळी थायलंड गुहेतील त्या रेस्क्यू ऑपरेशनचा अनुभव सांगितला. थायलंडमधील हिंदुस्थानी दूतावासाने या रेस्क्यू ऑपरेशनसाठी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड (केबीएल) कंपनीची शिफारस केली. तेथून संदेश मिळताच गुहेतील पाणी काढण्यासाठी महाराष्ट्रातील किर्लोस्करवाडी प्रकल्पातून चार पंप विमानाने थायलंडला नेण्यात आले. थाम लुआंग गुहेतील सखल भागात त्यावेळी पूरस्थितीच निर्माण झाली होती. गुहेमध्ये वीजपुरवठा शक्य नव्हता. मग तीन किलोमीटर अंतरावरून वीज आणली गेली, असे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यानंतर आमच्या पथकाने वीज गळती, गुहेतील पाण्याची खोली अशी सर्व गणिते मांडून पंप सुरू केला. उच्च क्षमतेचे पंप असल्याने गुहेतील पाण्याचा उपसा वेगाने होऊन सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले गेले असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या कंपनीच्या या कामगिरीचे जगभरात कौतुक होत आहे. यावेळी शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार विनायक राऊत, चंद्रकांत वैद्य आदी उपस्थित होते.

थायलंडला पुढील १०० वर्षे पुराचा धोका नाही
थायलंडला पुढील १०० वर्षे पुराचा धोका होणार नाही असे काम किर्लोस्करने तेथे केले आहे. २०११ मध्ये थायलंडमध्ये पूर आला होता तेव्हा आठ दिवसांत किर्लोस्करांच्या पंपांनी पुराच्या पाण्याचा उपसा केला होता. नंतर २०१५ मध्ये तेथे तीन मोठे पंप हाऊस बांधण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेलाही आवश्यकता भासल्यास अशा कामांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी किर्लोस्कर कंपनीने दर्शवली आहे.