बदलापूरमध्ये चिमुरडींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्याविरोधात जनतेत असंतोष आहे. अशा घटना रोखण्यासाठी, आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी शनिवार, 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत जनतेला कडकडीत बंद ठेवण्याचं आवाहन केलं. तसेच बंदचं स्वरुप कसं आहे, किती वाजेपर्यंत बंद असेल याची माहिती दिली. तसंच बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न सरकारनं केल्यास जनता त्यांचा फज्जा उडवेल, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतो की आपल्याला सुद्धा मुलीबाळी आहेत, कुटुंब आहेत त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही अकार्यक्षम असला तरी जनता सक्षम आहे. त्यामुळे बंदच्या आड पोलिसांना आततायी होऊ देऊ नका. सरकारने बंदच्या आड येऊ नये. मुद्दाम हट्टाने बंदचा फज्जा उडवायचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही तसा प्रयत्न केला तर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही’.
…म्हणून वेळीच जागे व्हा!
नागरिकांना विनंती आहे की, आपण कोणत्याही जातीपातीचे, धर्माचे, भाषांचे असाल तरी या बंदमध्ये सहभागी व्हा. आपल्या घरापर्यंत ही विकृती येऊ नये म्हणून वेळीच जागे व्हा आणि उंबरठ्यापर्यंत आलेलं संकट त्याचा मुकाबला करायला आम्ही सगळे एक आहोत, त्या एकजुटीचं एक विराट दर्शन उद्या घडवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं.
…नाहीतर मग आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल
View this post on Instagram
आता संतापाचा कडेलोट होत आहे. अजूनही बदलापुरात अटका सुरू आहेत असे तिथले लोक सांगतात. बदलापूरचे नागरिक उत्स्फूर्तपणे आंदोलनात उतरले होते. मात्र पोलिसांनी दरोडेखोरांना आणावं तसं आंदोलकांना दोरखंडात बांधून आणल्याचं आपण पाहिलं. माझी मागणी आहे की बदलापुरातील आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले गेलेच पाहिजे नाहीतर मग आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.
असं असेल बंदच स्वरुप
बंद बद्दलची माहिती देताना उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं की उद्याचा बंद हा फक्त महाविकास आघाडीचा बंद नसून जनतेच्या वतिने हा बंद केला जात आहे. यावेळी कडकडीत बंद असेल. बंदमधून अत्यावश्यक सेवा या वगळ्यात आल्या आहेत. तसेच सणांचे दिवस आहेत हे लक्षात घेऊन बंद दुपारी 2 वाजेपर्यंतच ठेवण्यात येईल. सण साजरे करयाचेच आहेत मात्र आमच्या मुलीबाळी, माता भगिनी सुरक्षित राहतील की नाही हा सुद्धा प्रश्न जनतेच्या मनात आहे. म्हणून बंद तर होणारच, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
> विकृती विरुद्ध संस्कृती असा उद्याचा बंद
आपली मुलगी शाळेत सुरक्षित राहील का? बहुतेक सगळ्याच महिला आणि पालकांची ही भावना आहे. कार्यालयं आणि रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या माता-भगिनींना वाटतंय इथे आपण सुरक्षित राहू का? आणि त्याच एकूण खदखदीला किंवा अस्वस्थेला वाचा फोडण्यासाठी उद्या बंद आहे. सरकार म्हणतंय उद्याचा बंद विरोधी पक्षांचा आहे. होय आम्ही विरोधी आहोत, पण आम्ही विरोधी या विकृतीचे आहोत. त्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे. विकृती विरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे.
> अत्यावश्यक सेवा राहणार सुरू
उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि आघाडीच्या मित्रपक्षांचाच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करत आहोत. त्यामुळे सर्व नागरिक यात सहभागी होतील. जात, पात, धर्म भाषा, भेद, राजकीय पक्ष या सर्व कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं. ही सर्वांना विनंती आहे. हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे. आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत, तसाच उद्याचा बंद राहील. कडकडीत बंद असायला पाहिजे. मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणजेच रुग्णवाहिका सेवा, वृत्तपत्र, अग्निशमन दल यासह आणि ज्या-ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या सुरू राहतील.
> उत्सवात सुद्धा आपल्या मुली सुरक्षित राहतील की नाही?
एकूणच पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत. गणपती बाप्पा येत आहेत. दहीहंडीची प्रॅक्टीस सुरू आहे. हा सर्व विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा, अशी विनंती आहे. अनेकांना उत्सव पण करायाचे आहेत, उत्साह पण आहे. त्याच्यामध्ये पण अगदी उत्सवात सुद्धा आपल्या मुली सुरक्षित राहतील की नाही? हा सुद्धा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनात आहे.
> जनतेच्या न्यायालयाचा दरवाजा उघडतो तेव्हा…
सरकारला काहीही म्हणू देत मी जनतेच्या वतीने बोलतोय. आणि जनतेलाही आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. केवळ जनतेचं मत हे लोकसभेमध्ये किंवा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या, पालिकेच्या वेळेलाच व्यक्त करता येतं असं नाही. तर मधल्या काळातही जनतेनं मत व्यक्त करायला पाहिजे. जर का ही यंत्रणा वेळेमध्ये हलली असती. तर हा उद्रेक झाला नसता. जे म्हणाहेत हे सगळं आंदोलन राजकारण्यांनी प्रेरित आहे, हे उत्स्फुर्त नव्हतं. मग उच्च न्यायालयाने याची स्वतःहून दखल घेतलेली आहे, ती सुद्धा राजकारण्यांनी प्रेरित घेतलेली आहे का? काल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला थोबडवलेलं आहे. हे थोबडवणं सुद्धा राजकारण्यांनी प्रेरित झालेत म्हणून उच्च न्यायालयाने केलंय का? जर उच्च न्यायालया स्वतःहून याची दखल घेत असेल, उत्स्फुर्तपणे सरकारला विचारत असेल तर जनतेलाही अधिकार आहे आणि जनतेचं न्यायालय हे वेगळं आहे. ज्या वेळेला सगळे रस्ते बंद होतात. तेव्हा जनतेच्या न्यायालयाचा दरवाजा उघडतो. तो दरवाजा थोडा हलायला लागला आहे. तो उघडू नये म्हणून या यंत्रणांनी आपआपली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे. आणि ती पाडली जात नाही, याची जाणीव करून देण्यासाठी उद्याचा हा बंद आहे. आणि उद्याचा बंद याचं यश अपयश हे राजकारणामध्ये मोजायचं कारण नाही. उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. त्यामुळे बंदचं यश अपयश हे संस्कृतीचं आणि विकृतीचं राहणार आहे. जे आपल्या राज्यातले सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक आहेत, त्या संगळ्याना सांगतो. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी हा बंद कडकडीत पाळून आम्ही तुमच्या कारभारावरती आणि आमच्या एकूणच माता-भगिनींच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त करत आहोत, हे सरकारला दाखवलं पाहिजे.
> एकजुटीचं विराट दर्शन हे उद्या घडलं पाहिजे
संतापाचा कडेलोट होतोय. बदलापूरचे नागरिक काल आले होते. तिथे अजूनही अटका सुरू आहेत. दरोडेखोरांच्या टेळीला आणवं तसं बदलापूरच्या दुष्कृत्याविरुद्ध उत्स्फुर्तपणे बदलापूरचे नागरिक उतरले होते त्यांना दोरखंडाच्या विळख्यातून अगदी कोणी पळून जाता कामा नये असं आणलं होतं. या पोलिसांना पहिले अटका झाल्या पाहिजेत. उद्याच्या बंदनंतर आम्ही पुढाकार घेणार आहोत. या सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे तत्काळ मागे घेतले गेलेच पाहिजेत. ही आमची आग्रही मागणी आहे, नाहीतर आम्हा रस्त्यावर उतरावं लागेल. पण उद्याचा बंद, राज्यातील तमाम जनतेला विनंती करतो की आपल्या घरापर्यंत ही विकृती येऊ नये म्हणून वेळेत जागे व्हा. आणि उंबरठ्यापर्यंत आलेलं संकट त्याचा मुकाबला करायला आम्ही सगळे एक आहोत त्या एकजुटीचं विराट दर्शन हे उद्या घडलं पाहिजे.