
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह सर्वपक्षीय शिष्टमंडळातील नेत्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली. मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्व महापालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पारदर्शक, निष्पक्ष पद्धतीने निवडणूका व्हाव्या यासाठी ही भेट घेण्यात आली व त्याबाबत निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आले.
या भेटीच्या वेळी शिष्टमंडळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, शेकाप नेते जयंत पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सुभाष लांडे, माकपचे सरचिटणीस अजित नवले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख देखील उपस्थित होते.