जिथे ठाकरे… तिथे शिवसेना… शिवसेनेचे हायकमांड ‘मातोश्री’; शिवसेना नेते संजय राऊत यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 ‘‘शिवसेना हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा नोंदणीकृत अधिकृत राजकीय पक्ष आहे आणि त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. जिथे ठाकरे…तिथे शिवसेना. शिवसेनेचे हायकमांड ‘मातोश्री’ आहे. फुटीर गटाला शिवसेनेची कार्यकारिणी बदलण्याचा अधिकार नाही. कायद्यानेही नाही आणि कोणत्याही नियमानेही नाही.’’ अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज फुटीर शिंदे गटावर हल्लाबोल केला.

बंडखोर एकनाथ शिंदे गटाने आज आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली.  शिंदे यांच्या ऑनलाइन बैठकीला शिवसेनेचे 14 खासदारही उपस्थित होते, असा दावा वृत्तवाहिन्यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊत यांनी तो दावा फसवा असल्याचे सांगत फेटाळून लावला.

संजय राऊत यांच्यासोबत यावेळी लोकसभेतील शिवसेना गटनेते विनायक राऊत, प्रतोद राजन विचारे, अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, प्रियंका चतुर्वेदी, संजय जाधव हे खासदार उपस्थित होते. लोकसभेत शिवसेना एकसंध आहे, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.  खासदार बंडखोरी करण्याचा प्रयत्न करत असतील तर  कायदेशीर आव्हान दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

20 तारखेला सुप्रीम कोर्टात न्याय होईल

‘‘शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत असलेली याचिका कायद्याच्या नियमांच्या आधारावर पक्की आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री दिल्लीत त्यांची खुर्ची वाचवायला येतील, पण यावर 20 तारखेला सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी स्थापन केलेल्या खंडपीठापुढे सुनावणी होत आहे. त्यात आम्हाला निश्चितच न्याय मिळेल.’’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

विधानसभा अध्यक्षांच्या नोटिशीला आव्हान

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षादरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जारी केलेल्या नोटिशीला शिवसेनेच्या 14 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून आव्हान दिले आहे. या याचिकेवर बुधवारी सत्तासंघर्षासंबंधी इतर याचिकांसोबत सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी सोमवारी ही नवी रिट याचिका दाखल केली. या याचिकेची सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या खंडपीठाने दखल घेतली आणि सुनावणीसाठी याचिकेचा स्वीकार केला. शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेसह इतर राजकीय मुद्दय़ांवर याआधी चार याचिका दाखल झालेल्या आहेत.

…हा कॉमेडी एक्स्प्रेस सीझन 2

‘‘फुटीर गटाला पक्ष म्हणून मान्यता नाही. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. ते शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त करतात हेच हास्यास्पद आहे. त्यांच्या कार्यकारिणीला अर्थ नाही. हा प्रकार म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सीझन 2 आहे. कॉमेडी एक्स्प्रेस सीझन 1 विधिमंडळात झाला आहे.’’ अशी खिल्ली संजय राऊत यांनी उडवली. सोबतच्या लोकांना भ्रमित करण्यासाठी, आमदार सांभाळण्यासाठी शिंदे गटाची ही धडपड सुरू आहे, असे खासदार राऊत म्हणाले.