
सध्या कोरोना नाही पण एक वेगळा व्हायरस… एकाधिकारशाहीचा, हुकूमशाहीचा व्हायरस देशात फैलावतो आहे. कोरोनात जसे मी तुम्हाला सांगितले, हात धुवा, मास्क लावा आणि दोन हात लांब राहा तसंच आवाहन आज मी तुम्हाला करत आहे. हा जो हुकूमशाहीचा व्हायरस आहे त्याच्यापासून दोन हात लांब राहा आणि हात धुवून त्याच्या मागे लागा. हा व्हायरस आपल्याला महाराष्ट्रातून संपवून टाकायचा आहे, अशी साद जनतेला घालत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपचे आणि मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.
उद्धव ठाकरे यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघात झंझावाती जनसंवाद दौरा सुरू आहे. आज सोनईतील पब्लिक स्कूल, श्रीरामपुरातील भगतसिंग चौक, राहुरी आणि राहाता येथे उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी तुफान गर्दी उसळली होती. उद्धव ठाकरे यांचे जनतेने जंगी स्वागत केले. जनतेच्या साक्षीनेच उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या दडपशाहीवर घणाघात केला.
मला काही व्हायचेय म्हणून मी मैदानात उतरलो नाही. तुमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी मैदानात उतरलो आहे… म्हटलं तर देशासाठी उतरलो आहे. देश वाचला पाहिजे, महाराष्ट्र वाचला पाहिजे, माझा शेतकरी जगला पाहिजे, माझ्या माता-भगिनी जगल्या पाहिजेत आणि त्याही लोकशाहीत जगल्या पाहिजेत. त्यासाठी हा लढा आहे. तुमचे आशीर्वाद मजबूतपणाने माझ्या पाठीशी ठेवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मोदींची स्वप्नं पूर्ण करायला भाजपात लायकीची माणसं नाहीत म्हणून दुसऱयांचे पक्ष पह्डताय का? भ्रष्टाचार करा आणि भाजपात या, तुम्हाला ‘ईडी’ काहीही करणार नाही, तुमच्या घरी झाडू मारेल, हीच मोदींची गॅरंटी का?’ असा सवाल करतानाच, ‘कितीही नेते भाजपपुढे झुकले, तरी आग्य्रात औरंगजेबापुढे ताठ मानेने जाणाऱया छत्रपती शिवरायांचा आदर्श हा महाराष्ट्र दिल्लीला दाखवल्याशिवाय राहणार नाही. मोडणार नाहीच, पण दिल्लीच्या तख्ताला वाकवणारच, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
‘महाराष्ट्रातील मोठमोठे नेते पह्डले की, येथील जनता पाळीव जनावरांसारखी त्यांच्यामागे येईल, असे जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटत असेल, तर तसे नाही मोदीजी! हा महाराष्ट्र नेहमी संकटाच्या छाताडावर चालून जाणारा आहे, संकटांना घाबरणारा नाही, ही महाराष्ट्राची ओळख आहे,’ असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी भाजपवर केला.
भाजपातील निष्ठावंतांचे काय?
‘भाजपचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही कार्यकर्ते कट्टर आहेत. त्या निष्ठावंतांना बाजूला ठेवून त्यांच्या डोक्यावर असे भ्रष्ट उपरे बसवत आहेत. मग कशासाठी तुम्ही मेहनत केली? हेच तुमचं हिंदुत्व आहे का? हे हिंदुत्व भाजप आणि संघाच्या त्या निष्ठावंतांना मान्य आहे का? तुम्ही म्हणाल ते हिंदुत्व, तुम्ही म्हणाल ते देशप्रेम, तुम्ही म्हणाल तो देशद्रोही, हे मान्य करणार नाही,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.
खासदाराला पराभवाचे पाणी पाजायचे आहे
‘इथले खासदार तिकडे गेले. त्यांनी आता आमच्यासमोर उभे राहून दाखवावे. निळवंडे धरणाचे पाणी आम्ही दिले. मात्र, श्रेय ते लाटत आहेत. येत्या निवडणुकीत जनता त्यांना पराभवाचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही,’ असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
मी तुम्हाला फक्त विश्वास देऊ शकतो
‘सोनईमधील सोन्यासारख्या मर्द मावळ्यांनो, मी राज्यभर फिरतोय. मी खरंच भारावून गेलो आहे. सत्ताधारी पक्षाच्या सभेला अशी गर्दी समजू शकतो. मात्र, ज्यांच्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही, मी आता तुम्हाला काही देऊ शकत नाही, तरीही तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात. मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे. याबदल्यात मी तुम्हाला एक गोष्ट देऊ शकतो, तो म्हणजे विश्वास! जो त्या गद्दारांकडे नाही,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी जनसमुदायाला साद घातली.
शंकरराव गडाख हे खरे निष्ठावान
‘अपक्ष निवडून आल्यानंतर आमदार शंकरराव गडाख माझ्याकडे आले. त्यांना आपण मंत्रिपद दिले. मात्र, दरम्यानच्या काळात गद्दारांनी सरकार पाडले. गद्दारांनी सरकार पाडले नसते, तर गडाख आजही मंत्री असते. विशेष म्हणजे, तिकडे गेले असते तरी ते मंत्री असते; पण त्यांनी धाडस दाखवले. आपल्या शब्दाला जागणारे गडाख हे खरे निष्ठावान आहेत,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आमदार गडाख यांचे कौतुक केले.
…विखेंच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार
शिर्डी परिसरात गुंडागर्दी वाढली आहे. पण, सरकारमान्य गुंडागर्दी असेल तर रोखणार कोण, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी विखे-पाटील घराण्यावर टीका केली. हे घराणे दहा घर फिरलेले आहे. आपल्याकडे पण आले होते. यांच्या घरात शिवसेनाप्रमुखांनी पहिल्यांदा मंत्री केले; पण तेही ते विसरले. जिकडे सत्ता तिकडे आम्ही. पण आता कुठे जाणार? भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या आयुष्यातील राजकारणातले शेवटचे ठिकाण आहे. कारण पुढची सत्ता आमच्याकडे येणार आहे. हे परत आले तरी घेणार नाही, असे सांगत त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांच्या काळातील घोटाळे तुम्ही बाहेर काढता. जरूर काढा, याबद्दल माझे दुमत नाही; पण तुम्हीसुद्धा गेल्या दहा वर्षांपासून सत्तेमध्ये आहात. तुम्ही नेमपं काय केले, काय नाही केले हेसुद्धा जनतेला सांगा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सुनावले. पंडित नेहरूंनी ज्या पंपन्या तयार केल्या. त्यातील किती कंपन्या तुम्ही विकल्या, हे आधी सांगा. सरदार पटेल पंतप्रधान व्हायला पाहिजे होते, असे म्हणतात. पण, त्यांनीच आरएसएसवर बंदी घातली. तुम्हाला चालणार आहे का? हेदेखील त्यांनी सांगितले पाहिजे.
चंदिगढमध्ये महापौरची निवडणूक जिंकता आली नाही. या निवडणूक प्रक्रियेवर सरन्यायाधीशांनी चिंता व्यक्त केली. निवडणुकीतून तुम्ही पळ काढता आहात. पण, जनता अंगावर आल्यावर तुम्ही पळणार कुठे? असे सांगतानाच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी इथली निवडणूक होणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी येऊ द्या. त्यांनी कितीही भूलथापा मारल्या तरी जनता बळी पडणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
व्यासपीठावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार शंकरराव गडाख, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई, संपर्कप्रमुख, आमदार सुनील शिंदे, उपनेते साजन पाचपुते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
तलाठीभरती घोटाळ्याची ‘ईडी’ चौकशी करा
‘राज्यात तलाठी भरती घोटाळा गाजतो आहे. हा देशातला भयंकर घोटाळा आहे. नगरचे पालकमंत्री यांचा त्यात हात आहे. त्यामुळे या घोटाळय़ाची ‘ईडी’ चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. ही चौकशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस करतील का?’ असे आव्हान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राहाता येथील शिवसेना संवाद मेळाव्यात केला.
‘या जिह्यात काय चालले आहे? मोदी घराणेशाहीविरोधात बोलतात, ‘पद्मश्री’विषयी बोलत नाहीत. त्यांनी मोठे काम केलेले आहे. राजेश परजणे यांना ‘महानंदा’चे अध्यक्षपद दिले. भाऊ मेडिकल कॉलेज पाहतात. ही घराणेशाही नाही का?’ असा सवाल संजय राऊत यांनी केला.
कारवाई करणार का?
‘गणेश सहकारी साखर कारखान्यात 112 कोटी रुपयांचा काळाबाजार केला. 598 कामगारांच्या नोकऱया घालवल्या. ज्याचे पाकिस्तानशी संबंध आहेत, त्या झाकीर नाईकच्या माध्यमातून विखे-पाटील ट्रस्टला पाच कोटी रुपये मिळाले आहेत. विखे-पाटील म्हणतात, ‘आम्हाला पाच नाही, अडीच कोटी मिळाले आहेत.’ यापेक्षा कोणता पुरावा ‘ईडी’ला पाहिजे. याबाबत ईडी कारवाई करणार का?’ असा सवाल संजय राऊत केला.
शेतकरी आंदोलनावर उद्धव ठाकरे काय म्हणाले…
शेतकरी दिल्लीच्या सीमेवर गेले आहेत. ते चीनमध्ये किंवा पाकिस्तानात घुसत नाहीत. आपल्या स्वतःच्या हक्काच्या राजधानीमध्ये येत आहेत. मंत्र्याला भेटायला येत आहेत, पण त्यांच्या मार्गात अडथळे उभे केलेत. दिल्लीच्या वेशीवर सैन्यच जणू उतरवले आहे.
ज्यांच्या मतांवरती तुम्ही पंतप्रधान झालात. ज्यांची मते मागायला ‘मेरे प्यारे देशवासियो’ म्हणून फिरता. कधी कधी त्यांच्या घरात जाता. त्यांच्याबरोबर जेवता. तो शेतकरी तुमच्या घरात आलेला चालत नाही का?
काबाडकष्ट करणारा शेतकरी हमीभाव द्या, हमीभाव द्या म्हणून आक्रोश करतो आहे. त्याला हमीभाव दिला जात नाही, मात्र जो गद्दारी करतो त्याला खोक्यांचा भाव मिळतो आहे.
शेतकऱयांचा सरकारविरुद्ध उठाव चॅनेलवाले दाखवणार नाहीत. कारण त्यांच्यावर सरकारचा दबाव आहे.
शेतकऱयांवर अश्रुधूर का सोडताय? शेतकरी असाच रडतोय. त्याच्या डोळ्यात अश्रुधारा लागल्यात. तो मागतोय ते देत का नाही? तो भीक नाही, काबाडकष्टाचा मोबदला मागतोय.
शेतकऱयांविरोधात वेडेवाकडे वागाल तर संपूर्ण महाराष्ट्र दिल्लीतील शेतकऱयांच्या पाठीशी उभा ठाकेल.
शिवसेनेला धुमारे फुटत आहेत
‘ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आज पक्षात घेऊन राज्यसभा, मंत्रिपदे देण्यात येत आहेत, हीच मोदींची गॅरंटी आहे का?’ असा सवालही त्यांनी विचारला. ‘अशोक चव्हाण गेल्याचा महाविकास आघाडी, तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना कुणालाच काही फरक पडणार नाही,’ असे सांगतानाच, ‘शिवसेनेत सडलेली पाने झडली आहेत. आता नवीन पाने फुटत असून, शिवसेनेला नवीन धुमारे फुटत आहेत,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारच्या नालायक कारभाराचा पंचनामा करण्याची वेळ आली आहे
‘राज्यात गारपीट, अवकाळीचा तडाखा बसून मराठवाडा-विदर्भात शेतकऱयांची पिके वाया गेली आहेत. नुकसानग्रस्तांना विमा योजनेचा लाभ मिळत नाही, राज्य संकटात आहे. संकट आल्यानंतरही अद्यापि मुख्यमंत्र्यांचे त्यावर स्टेटमेंट आलेले नाही. केवळ ‘त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत,’ असे म्हणणाऱया या सरकारच्याच नालायक कारभाराचा आता पंचनामा करण्याची वेळ आली आहे,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर आसूड ओढला.
सोनईत जंगी स्वागत
उद्धव ठाकरे यांचे सोनई गावात जंगी स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी लोटली होती. उद्धव ठाकरे यांचा ताफा पोहचताच जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. शिवसेनेच्या जयघोषाने अवघा आसमंत दणाणून गेला होता.
फडणवीसांची अवस्था‘मला नाही अब्रू मी कशाला घाबरू!’
देवेंद्र फडणवीसांचं कोणत्या शब्दांत वर्णन करावं तेच समजत नाही. फडतूस बोलून झालं, कलंक बोलून झालं, नालायक बोलून झालं. पण काही फरकच पडत नाही. आता तर इतके बेगुमानपणाने वागताहेत की निर्लज्जम सदासुखी असंच म्हणावं लागेल. ज्या अशोक चव्हाणांवर आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून त्यांचे स्वागत करत आहेत. फडणवीसांची अवस्था ‘मला नाही अब्रू मी कशाला घाबरू’ अशी झाली आहे. निर्लज्ज असतो तो सदा सुखी असतो. मुख्यमंत्र्याचा पाव मुख्यमंत्री केला तरी आनंदात आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.
उद्धव ठाकरे यांचा आजचा जनसंवाद
आंबेडकर मैदान, कोपरगाव सकाळी 10 वा.
संगमनेर बस स्टँडसमोर सकाळी 11.30 वा.
बाजारतळ, अकोले दुपारी 1.15 वा.




























































