शिकारीची सुपारी देणारेच समितीवर अवनीच्या मृत्यूची चौकशी हा फार्स, उद्धव ठाकरे कडाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uddhav-thackeray

सामना प्रतिनिधी । मुंबई

अवनीला मारण्याची ज्या लोकांनी सुपारी दिली, ज्यांनी शिकाऱयाला बोलावण्यासाठी पुढाकार घेतला त्याच लोकांना न्यायमूर्ती नेमल्यासारखं दाखवून चौकशीचा फार्स रचला जातोय, कमिटी नेमण्याचं केवळ नाटक केलं जातंय. त्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरळ गोळय़ा झाडल्या त्यांचा सत्कार करून मोकळं व्हावं, असा संताप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

पांढरकवडा अरण्यातील वाघीण अवनी हिच्या मृत्यूप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीवरून उद्धव ठाकरे यांनी सरकारवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, ज्या लोकांनी अवनीला मारण्यासाठी पाठिंबा दिला त्याच लोकांना चौकशीसाठी नेमणार असाल तर त्या समितीला काही अर्थ नाही. ती नेमली काय किंवा नाही नेमली काय सारखेच. मुख्यमंत्र्यांनी सरळ निर्णय जाहीर केला असता तरी फरक पडला नसता.

न्यायालयीन चौकशी करा!
कमिटी पूर्णपणे रद्द करून न्यायालयीन चौकशी व्हावी. किमान निवृत्त न्यायाधीश जे निःपक्षपातीपणे चौकशी करू शकतील त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

सैनिकांच्या शौर्याचं श्रेय घेत असाल तर अवनीच्या गोळीचंही घ्या!
मुख्यमंत्री म्हणतात सुधीरभाऊ स्वतः अवनीला गोळी झाडायला गेले नव्हते. सुधीरभाऊ जर गोळी झाडायला गेले नसतील तर मग जो सर्जिकल स्ट्राइक आमच्या सैनिकांनी केला त्यावेळीसुद्धा मोदी बंदूक घेऊन सर्जिकल स्ट्राइक करायला गेले नव्हते. सैनिकांच्या शौर्याचं जर श्रेय तुम्ही घेऊ शकत असाल तर अवनीच्या गोळीचं पापही सुधीरभाऊ आणि सरकारने घ्यावं, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

…तर उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू
उद्धवजी युती सरकारचे महत्त्वाचे नेते आहेत. वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी काही चुकीचे किंवा शंकास्पद असेल तर आम्ही उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमू शकतो. ते जर तयार असतील तर हे आम्ही करू शकतो. चौकशी समितीचे प्रमुखपद त्यांनी न स्वीकारल्यास सुप्रीम कोर्टाच्या पाच निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी समिती नेमण्याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना केलीच आहे अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. दरम्यान, अवनीला ठार करण्याचे आदेश मुनगंटीवार यांनी नव्हे, तर प्रधान मुख्य वन संरक्षकांनी दिले होते असा खुलासा वनखात्याने केला आहे.