
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटवावेच लागेल. त्यांची वक्तव्ये ही ‘स्लिप ऑफ टंग’ नाही. हे चाळे आता बस्स झाले. राज्यपालांचे हे सॅम्पल परत घ्या आणि कुठेही पाठवा. अगदी वृद्धाश्रमात पाठवले तरी चालेल,’ अशी तोफ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज डागली. ‘महाराष्ट्राचे आदर्श पुसून टाकण्याची चाल खेळणाऱया महाराष्ट्रद्रोह्यांना खणखणीत आणि दणदणीत असा इंगा दाखवावाच लागेल. त्यासाठी पक्ष बाजूला ठेवून सर्व महाराष्ट्रप्रेमींनी, अगदी भाजपामधील महाराष्ट्रप्रेमींनीही एकत्र यायला हवे,’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या मुद्दय़ावर महाराष्ट्र बंद करायचा, विराट मोर्चा काढायचा की अन्य कोणता मार्ग अवलंबायचा याचा निर्णय येत्या दोन-चार दिवसांत घेतला जाईल असे सांगतानाच, राज्यपालांना हटवले नाही तर आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, केंद्र सरकारला कळलेच पाहिजे की महाराष्ट्र हा लेच्यापेच्यांचा प्रदेश नाही.’ असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे भाजपचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपा प्रवत्ते सुधांशू त्रिवेदी आणि त्यांची पाठराखण करणाऱया मिंधे सरकारवर आज उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन कडाडून हल्ला चढवला. महाराष्ट्रातील गावांवर दावा करणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालायचा, महाराष्ट्राचे तुकडे पाडायचे, महाराष्ट्राला बेकार आणि पंगाल करायचे हा भाजपचा राष्ट्रीय कार्यक्रम बनला आहे का? असा खणखणीत सवालही त्यांनी यावेळी केला.
वृद्धाश्रमातही ज्यांना जागा नाही अशांना राज्यपाल नेमले जाते का?
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी घणाघात केला. ते म्हणाले की, ‘केंद्रात ज्यांचे सरकार असते त्यांची माणसे किंवा त्यांच्या विचारसरणीची माणसे देशातील राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून पाठवली जातात. पण आता वृध्दाश्रमातही ज्यांना जागा नाही अशा व्यक्तींना राज्यपाल नेमले जाते का? असा प्रश्न केंद्र सरकारला विचारावा लागेल.’ राज्यपालांच्या नियुक्तीचेही निकष आता ठरवायला पाहिजेत असे स्पष्ट मतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
राज्यपालांची वक्तव्ये केंद्राने गांभीर्याने घेतली पाहिजेत
राज्यपाल हे आपल्या महामहीम राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपती हे निष्पक्ष असायला हवेत. ते असतात आणि त्याप्रमाणेच राज्यपालही निष्पक्ष असायला हवेत. राज्यामध्ये काही पेचप्रसंग निर्माण झाला तर त्याची सोडवणूक राष्ट्रपतींच्या मध्यस्थीने करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. परंतु ज्यांचे सरकार केंद्रात असते त्यांच्या विचारसरणीची माणसे राज्यपाल म्हणून पाठवल्यानंतर ते काय बोलतात ते केंद्राने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
…ही भाजपची चाल
हळुवारपणे महाराष्ट्राच्या आदर्शांचा अपमान करायचा आणि महाराष्ट्राच्या मनात, रक्तात भिनलेले आदर्श पुसून टाकायचे आणि नंतर आपलीच भाकडं म्हणजेच आपल्याच नेते मंडळींची प्रतिमा आदर्श म्हणून जनतेच्या मनावर बिंबवण्याची ही भाजपाची चाल आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मिंध्यांना महाराष्ट्राची चिंता नाही
मिंधे सरकारवरही उद्धव ठाकरे यांनी यावेळी टीका केली. ‘मिंधे सरकार हे महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळत आहे. महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला घेऊन गेले. पॅबिनेट मिटींग ही अपवादात्मक परिस्थितीत पुढे ढकलली जाते. पण मंत्रिमंडळातील बरीचसे लोक कॅबिनेट बैठक रद्द करून गुजरातमध्ये प्रचाराला गेले होते. त्यांना महाराष्ट्र उघडय़ावर पडलाय त्याची खंत नाही. महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान होतोय त्याची चिंता नाही.’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
संजय राऊत यांना सुरक्षेअभावी काही झाले तर सरकार जबाबदार
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची सुरक्षा राज्य सरकारने हटवली. सत्ता आली की विरोधकांची सुरक्षा हटवायची असा पायंडा महाराष्ट्रात पडतोय की काय असा प्रश्न यावेळी प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना केला. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘आमची सत्ता होती तेव्हा सुरक्षाव्यवस्था ही आम्ही पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडे सोपवली होती. ज्यांना सुरक्षेची आवश्यकता आहे त्यांना आवश्यक ती सुरक्षा दिली गेलीच पाहिजे. संजय राऊत यांना अनावश्यक सुरक्षा नव्हती. पण संजय राऊत यांच्या वाईटावरच काही लोपं टपली आहेत. त्यांनी त्यांची सुरक्षा काढली. त्यामुळे संजय राऊत यांना सुरक्षेअभावी काही झाले तर त्याची जबाबदारी सरकारची असेल.’
…आता छत्रपतींचा अपमान झाल्यावर भाजपवाले कोणाला जोडे मारणार?
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी फक्त ‘आम्ही त्यांच्या विधानाशी सहमत नाही’ इतकीच भूमिका मांडली असे भाजपचे नेते म्हणत असल्याचे प्रसारमाध्यमांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना सांगितले. त्यावर ‘छत्रपतींचा अपमान करणाऱयांनी आम्हाला सावरकरांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करू नये.’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘सावरकरांचा अपमान झाल्यावर आम्ही गप्प राहिलो नाही. तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यानंतर राहुल गांधी यांनी तो विषय टाळला. मात्र त्यावेळी भाजपवाले जसे अंगावर आले होते तसे आता छत्रपतींचा अपमान झाल्यावर का जात नाहीत? आता कोणाला जोडे मारणार?’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. यानंतर संजय राऊत यांनीही हस्तक्षेप करत त्यावेळी शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिले. ‘अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे शिवसेनेकडून महाविकास आघाडीला तडे पडतील. आम्हाला पर्वा नाही. पण सावरकरांबद्दल असे वक्तव्य मी सहन करणार नाही.’ अशी स्पष्ट भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी घेतली होती असे संजय राऊत म्हणाले. त्यावर आता तशीच भूमिका मिंधे गटाने घ्यावी असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
कोश्यारींच्या सडक्या मेंदूमागे नक्की कुणाचा मेंदू आहे शोधावा लागेल
राज्यपाल पदाचा मी बहुमान करतो, पण कोश्यारींना राज्यपाल म्हणणे मी सोडून दिले आहे असे सांगतानाच, राज्यपाल पदाची झूल अंगावर पांघरली म्हणून कुणीही व्यक्ती वेडेवाकडे काहीही बोलावे हे मी आणि माझा महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. ‘यापूर्वी कोश्यारींनी मुंबई, ठाण्यातील मराठी माणसाचा अवमान केला होता. सावित्रीबाई फुलेंबद्दल उलटसुलट बोलले होते. आता आमचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी अवहेलना केली. महाराष्ट्रातल्या आदर्शांचा अवमान करण्याची ही शक्कल कोश्यारींच्या काळ्या टोपीतून आलेली नाही. तर या सडक्या मेंदूच्या मागे नक्की कुठला मेंदू आहे त्याचा शोध घ्यावा लागेल.’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
…उद्या पाकिस्तानातल्या निवडणुकीसाठीही सुट्टी देतील
गुजरातमधील निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मतदारांना मिंधे सरकारने मतदानासाठी सुट्टी जाहीर केली. त्याबद्दल यावेळी प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘हे महाराष्ट्र सरकार आहे की गुजरात सरकार हेच कळत नाही. राज्याचे मंत्रिमंडळ गुजरातमधील प्रचारात व्यस्त आहे. गुजरातमधील निवडणुकांसाठी महाराष्ट्रात सुट्टी देणे ही नवीनच पध्दत आहे. उद्या पाकिस्तानात निवडणुका असल्या तर हे कदाचित पूर्ण देशातही सुट्टी जाहीर करतील.’
…पाकव्याप्त कश्मीर जिंकल्यावर 100 गावे देऊ म्हणतील
बोम्मईंना काहीच न बोलणाऱया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील ईडी, मिंधे, खोके सरकारला मुख्यमंत्री आहेत की नाहीत हेच कळत नाही. कारण ते कधी बोलतच नाहीत. त्यांना विचारले तर ते म्हणतील, काळजी करू नका, पंतप्रधानांना मी सांगितले आहे. पंतप्रधान म्हणाले, कर्नाटकने चाळीस गावे घेतली तर त्यांना द्या. आपण पाकव्याप्त कश्मीर जिंकल्यानंतर शंभर गावे आम्ही महाराष्ट्राला देऊ. अशा मुख्यमंत्र्यांकडून काहीच अपेक्षा नाही.’ बोम्मईंना वरिष्ठांचा आशिर्वाद आहे की ही केंद्राची भूमिका आहे हेसुद्धा स्पष्ट व्हायला हवे असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कर्नाटकवाले आपली चाळीस गावे मागताहेत. जणू काही महाराष्ट्रात माणसे राहतच नाहीत. महाराष्ट्राला अस्मिता स्वाभिमान, हिंमत, धमक, शक्ती काहीच नाही. कुणीही यावे टपली मारावी आणि आम्ही केवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणून गप्प बसायचे हे आतापर्यंत खूप झाले. छत्रपतींचा अपमान आता सहन केला जाणार नाही.
आपली अस्मिता आणि राज्य चिरडले जाणार असेल तर आपण छत्रपतींचे नाव घेण्यास नालायक आहोत.
लाचार मुख्यमंत्र्यांची कोश्यारींविरुद्ध बोलण्याची हिंमत नाही
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समाचार घेतला. ‘विद्यमान मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या कृपेमुळे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज्यपालांच्या विरोधात बोलण्याची त्यांच्यात हिंमत नाही,’ असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. मुख्यमंत्री म्हणजे ‘पैचान कोन’ अशी अवस्था आहे. उपमुख्यमंत्री फक्त सारवासारव करताहेत. त्यांना महाराष्ट्र उघडय़ावर पडलाय त्याची खंत नाही, महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान होतोय त्याची चिंता नाही,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी फटकारले.
कोश्यारींना राज्यपाल म्हणणे मी सोडून दिले आहे . महाराष्ट्राच्या आदर्शांचा अपमान करण्याची जी काही शक्कल आहे ती राज्यपालांच्या काळय़ा टोपीतून आलेली नाही. यामागे कोण आहे, या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोणाचा आहे याचा शोध घेण्याची वेळ आली आहे.
हे असेच चालू राहिले तर आपल्या डोळय़ांदेखत आपल्या या शूरवीर म्हटल्या जाणाऱया राज्याच्या अब्रूची लक्तरे हे लोक वेशीवर टांगतील आणि ते आपल्याला नुसते बघत बसावे लागेल. म्हणून हीच योग्य वेळ आहे. सगळय़ांनी एकत्र येऊन या महाराष्ट्रद्रोह्यांना इंगा दाखवलाच पाहिजे.
हे केवळ स्लिप ऑफ टंग नाही. स्लिप ऑफ टंग एकदाच होऊ शकते. सारखी सारखी होऊ शकत नाही. त्यामुळेच आता आपण काही केले नाही तर आपला महाराष्ट्र हे लोक कुठे नेऊन ठेवतील याचा अंदाजही लागणार नाही.
































































