
परिसरात गाडी लावण्यासाठी हप्ता देण्याच्या वादातून उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात काही अज्ञात व्यक्तींनी २० राऊंड फायर केले. त्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला असून अन्य एकजण जखमी झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस पथकाने वांगणीत सापळा रचून शूटरसह दोघांच्या मुसक्या आवळल्या. शूटर शेखर बिराजदार आणि अजय राव अशी अटक आरोपींची नावे आहेत.
हप्ता मागण्यापूर्वीच्या वादातून हल्लेखोरांनी अनिल चौहान, अमन चौहान आणि अर्जुन चौहान यांच्यावर गोळीबार केला होता. यात गंभीर जखमी झालेल्या अनिल, अमनचा मृत्यू झाला. पोलिस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे, हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप शिनवळे, क्राइम ब्रँच घटक ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आहाड यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान कैलास कॉलनी चौकात झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात क्राइम ब्रँच घटक ४ ला मोठे यश मिळाले. या फायरिंग प्रकरणातील काही आरोपी हे सकाळी वांगणीमध्ये येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार राजेंद्र थोरवे यांना मिळाली होती.
चार पथके तैनात
वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश आहाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक पवार, पोलिस अंमलदार राजेंद्र थोरवे, गणेश गावडे, रितेश बंजारी, योगेश वाघ, प्रसाद तोंडलीकर, रामदास उगले, शेखर भावेकर आणि बाबू जाधव यांच्या पथकाने वांगणीत सापळा रचला. सकाळी सातच्या सुमारास मुख्य शूटर शेखर बिराजदार आणि अजय राव यांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणात आणखीन काही आरोपी असून त्यांचा शोध घेण्यासाठी चार पथके तैनात करण्यात आली असल्याचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितले.

























































