Chef उमेश जाधव Coming Soon…

शेफ विष्णू मनोहर, manohar.vishnu@gmail.com

नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव. सामीष भोजनाबरोबर हरिद्वारची पुरी भाजीही तितकीच प्रिय.

उमेश जाधव मराठीतील नाणावलेला नृत्य दिग्दर्शक. त्यांची माझी भेट एका सेलेब्रिटी क्रिकेट मॅचनिमित्ताने पुण्यात झाली. जेव्हा त्यांना म्हटलं की तुमच्याबरोबर जेवता-जेवता गप्पा मारायच्या आहेत. मी म्हणालो, कुठे जायचं तर ते लगेच म्हणाले विष्णूजी की, रसोई. रसोईत आल्यानंतर आमचं खाणं आणि गप्पा सुरू झाल्यात. गप्पा सुरू करण्यापूर्वी उकडलेली बोरं आणि टोमॅटो सार  घेतलं.

उमेश जाधव यांना मुळात अभिनेता व्हायचं होतं पण त्यांनी कोरिओग्राफर म्हणून काम करण्याचं ठरवलं. मुळातच आर्टिस्ट असल्यामुळे नाचण्याची आवड होती आणि पूर्णपणे या क्षेत्रात यायलासुद्धा एक कारण घडलं. 1995-96 सालाची गोष्ट असेल. एकदा पुण्यात हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी सरोज खान येणार होत्या, पण अतिव्यस्ततेमुळे त्यांनी त्यांचा असिस्टंट अहमद खान याला पाठवलं. योगायोगाने उमेश जाधव यांची आणि अहमद खान यांची ओळख झाली. उमेशमधील गुण बघून त्यांनी बरोबर काम करशील का असं विचारलं आणि उमेश लगेच तयार झाला. डान्स सिक्वेंससाठी उमेश स्टेप्स करायचा पण को-डान्सर दोन दिवस झाले तरी आले नाहीत. मग उमेशने पुढाकार घेऊन पुण्यातील डान्सर त्यांना जमवून दिले. त्याच्या कामावर खूश होऊन अहमद खान याने ‘रंगीला’ या चित्रपटात त्याला पूर्णपणे असिस्टंट डान्स डिरेक्टर म्हणून संधी दिली.

उमेशला जेवढी नाचण्याची आवड आहे तेवढीच खाण्याचीसुद्धा  आहे. त्याच्याशी बोलताना पदोपदी जाणवत होते. नागपूर-विदर्भाचा  भाग सोडून संपूर्ण महाराष्ट्र, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश इत्यादी ठिकाणी बऱ्याचदा कामानिमित्ताने त्याचं जाण होतं. त्यामुळे बहुतेक सगळ्या ठिकाणची खासियत, कुठे-काय जेवण मिळतं, नावासकट त्याला ठाऊक आहे. आतापर्यंत मी जेवढे कोरिओग्राफर पाहिले ते सगळे हेवीवेट आहेत. मग तुम्ही स्वतःला कसं काय मेंटेन ठेवता यावर ते म्हणाले, मी सर्वच खातो पण प्रमाणात. एखाद्या दिवशी जर जड पदार्थ खाल्ले तर त्याची भरपाई दुसऱ्या दिवशी करतो मग त्यामध्ये एक वेळचे जेवण कमी करणे, मोजकं खाणे, तेलकट पदार्थ टाळणे असे प्रयोग असतात. त्यांची पत्नी गुजराती आणि व्यवसायाने डॉक्टरसुद्धा. त्यामुळे घरात मांसाहार चालत नाही पण उमेशला मासे भरपूर आवडतात. त्याचबरोबर कोल्हापुरी अळणी चिकन, सुकं मटण बरोबर गुजराती दाल-ढोकला, खमण ढोकला, सुरती डाळ, गुजराती कढी इत्यादी प्रकारसुद्धा मनापासून आवडतात. गोडाची विशिष्ट आवड नाही पण गोड चालत नाही असेही नाही. खोबऱ्याची वडी, बेसन लाडू, ताजा बुंदीचा लाडू आणि भिकाजीकडील मोहनथाळ त्यांच्या सासूबाईंना आवडतं म्हणून ते आठवणीने घेऊन जातात.

उमेश अमृसरला गेले असताना तिथल्या केसर ढाब्याचं वर्णन केलं.  तिथला स्टफ पराठा जो तुपाबरोबर परतून सोबत बटर पेपरवर लोणी असलेला कागद देतात त्याबरोबर चार फुटांच्या तांब्याच्या हंडीतील माकी दाल जी कित्येक वर्षांपासून त्याच हंडीत शिजत असते. त्याची चव अजूनही रेंगाळते. एक आठवण अजून त्याने सांगितली हरिद्वारची. एका घाटावर एक मिठाई दुकान प्रसिद्ध आहे. त्याचं नाव मोहन मिठाईवाला. घाटावरच मिठाईचं दुकान तिथं काय मिळणार? पण भूक लागली होती म्हणून भाजी-पुरी खाऊ असा विचार केला. मग पहिले दोन पुऱ्या, नंतर पाच, त्यानंतर आठ-दहा पुऱ्या कधी हे लक्षातच आले नाही. पुऱ्यांबरोबर तिथला सोजी हलवा, दही वडे, बेडमी पुरी यावर सुद्धा ताव मारला.

त्याचे एक स्वप्न आहे ते म्हणजे जगावेगळं असं रेस्टॉरंट उघडण्याचं. रेस्टॉरंटबद्दल त्याच्या भन्नाट आयडिया आहेत. पण त्याबद्दल मी आता काहीही सांगणार नाही, ते उघडल्यावर अनुभव घ्या. त्यांच्या बरोबर गप्पा मारताना दीड तास कसा गेला समजलंच नाही. गप्पा संपता-संपता अशी जाणीव झाली की ‘शेफ उमेश जाधव’ कमिंग सून…

patrani-machhhiपात्रानी मच्छी

साहित्य एक पापलेट मासा, सातपाटी मसाला 2 वाटय़ा, लवंग 7-8, खोबऱ्याचे तेल (हे तेल आवडत नसल्यास पर्यायी तेल वापरावे) 4 चमचे, केळीचे पान व ऍल्युमिनियम फॉईल गरजेप्रमाणे, लिंबू 1, मीठ चवीनुसार.

कृती मासा साफ करून स्वच्छ धुऊन मीठ व लिंबू चोळून ठेवावा. लवंगा माशाला मधे मधे टोचून घ्याव्यात. सातपाटी मसाला माशांच्या मध्ये भरून, असा पूर्ण मसाला केळीच्या पानात गुंडाळून वरून ऍल्युमिनियम फॉईल लावावी. विस्तवावर मंदाग्नीत शेकवा. शेकल्यानंतर केळीचे पान व ऍल्युमिलियम फॉईल काढून असे शेकलेले मासे खायचेवेळी तव्यावर थोडेसे तेल टाकून परतून घ्यायचे व वेळेवर तुकडे कापून खावे. केळीच्या पानामुळे पदार्थाला वेगळाच स्वाद येतो. याबरोबर ज्याला मिरचीच्या बियांची व हिंगाची फोडणी दिलेली असेल असे नारळाचे पाणी मधे मधे चवीला प्यावे.

सातपाटी मसालाsatpati-masala

साहित्य ओला नारळ 2 वाटय़ा, तांदळाची पिठी 2 चमचे, 2 लिंबांचा रस , बडीशेप पावडर 1 चमचा, धणे पावडर 2 चमचे, हिरवी मिरची व कोथिंबीरचे वाटण 1 वाटी, लाल मिरची भिजवून वाटलेली अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, हळद पाव चमचा.

कृती वरील सर्व मिश्रण व ओले नारळ एकत्र बारीक वाटून ठेवावे. हा मसाला माश्यांचे पदार्थ बनवायला वापरता येईल.

fruit-pizza-20फ्रुट पिझ्झा

साहित्य पिझ्झा बेस 1, ऑरेंज ज्यूस 1 वाटी, मिक्स फ्रुट जॅम 4 चमचे, सफरचंद, संत्र, द्राक्ष 2 वाटय़ा, मध 2 चमचे, बटर 1 चमचा, टुटी फ्रुटी 4 चमचे, मोझेरोला चीज अर्धी वाटी, प्रोसेस चीज अर्धी वाटी, पनीर 1 वाटी.

कृती पिझ्झा बेस घेऊन त्यावर थोडे बटर, मिक्स फ्रुट जॅम, बारीक केलेली फळे, टुटी फ्रुटी, पनीर, शेवटी दोन्ही चीज घालून 3 ते 4 मिनिटे 60 टक्के मायक्रोव्हेववर गरम करा.

टीप मायक्रोव्हेवमध्ये तयार केलेला पिझ्झा, केक, इत्यादी बेकरीच्या वस्तू या ब्राऊन होत नाहीत.