नगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचे आज उद्घाटन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील बहुचर्चित आणि एका तपापासून प्रलंबित असलेल्या उड्डाणपुलाचे उद्या (दि. 19) उद्घाटन होत आहे. नगरकरांचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाले असून, शहरवासीयांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. दरम्यान, केंद्रीय रस्तेविकासमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार असले, तरी ते आजारी असल्याने त्यांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता वर्तविली जात आहे.

नगर शहरातील उड्डाणपुलाचे काम 12 वर्षांपूर्वी पहिल्यांदा सुरू करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित ठेकेदाराला मारहाण झाल्यानंतर हे काम बंद पडले होते. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते दिवंगत अनिल राठोड यांनी उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यासाठी उपोषण केले होते. तर, तत्कालीन खासदार दिलीप गांधी  यांनीही पाठपुरावा केला होता. 12 वर्षांपूर्वी 18 कोटी रुपये खर्च असलेल्या या उड्डाणपुलाचा खर्च आता 330 कोटी रुपयांवर गेला आहे. उड्डाणपुलासाठी यापूर्वी तीनवेळा भूमिपूजन करण्यात आले होते. खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दोन वर्षे पाठपुरावा करून लष्कराच्या जागेचा विषय मार्गी लावल्यानंतर खऱया अर्थाने उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली.

उद्या या उड्डाणपुलाचे उद्घाटन होत असले, तरीही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आजारी असल्यामुळे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत गडकरी यांचा दौरा जाहीर झाला नव्हता.