वरळीत 640 गाडय़ांसाठी भूमिगत पार्किंग – पालिका खर्च करणार 216 कोटी, इंजिनीयरिंग हबजवळ सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगरपालिका वरळी इंजिनीयरिंग हबजवळ 640 गाडय़ांसाठी भूमिगत पार्किंग बांधणार आहे. यासाठी पालिका 216.94 कोटी रुपये खर्च करणार आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या असून चार वर्षांत हे वाहनतळ बांधून पूर्ण करावे लागणार आहे. या स्वयंचलित पार्किंग सुविधेमुळे वाहनचालकांची मोठी सोय होणार आहे.

मुंबईत दररोज वाढणाऱया गाडय़ांमुळे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या निर्माण होत आहेत. पालिकेची उपलब्ध 32 वाहनतळांवर ही व्यवस्था पुरेशी ठरत नाही. संपूर्ण मुंबईत यामुळे बेशिस्तपणे वाहने पार्क केली जातात. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होते. तर अपघात होण्याचा धोकाही निर्माण होतो. त्यामुळे पालिकेकडून पार्किंग धोरण राबवण्यात येत आहे. यामध्ये जास्तीत जास्त वाहनतळ बांधण्यात येत आहेत. यामध्ये भूमिगत पार्किंगमुळे जागेचा प्रश्न मिटणार असून सुविधाही निर्माण होत आहेत. यामध्ये माटुंगा येथे 475 वाहनांसाठी तर मुंबादेवी येथे 546 वाहनांसाठी भूमिगत पार्ंकगची सुविधा सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे.

अशी राहणार सुविधा

वरळीसह पालिका वांद्रे पश्चिम पटवर्धन उद्यान, हुतात्मा चौक या ठिकाणीदेखील भूमिगत पार्किंग सुविधा सुरू करणार आहे. यामध्ये कंत्राटदाराला आराखडा तयार करणे आणि प्रचलन करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. या कामासाठी 20 वर्षांचे कंत्राट देण्यात येईल. या ठिकाणी रोबोटिक पार्किंगसारख्या अत्याधुनिक सुविधा असतील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.