कांदा खात नाही, तर किंमतीवर कसा बोलू, भाजप मंत्र्यांचं अजब विधान 

737

कांद्याच्या किंमतीत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. देशभरात कांद्याच्या चढ्या भावामुळे कांदा सामान्य नागरिकांच्या आवाक्याच्या बाहेर होत चालला आहे. अशातच भाजपच्या एका मंत्र्याने यावर अजब वक्तव्य केलं आहे. ‘मी शुद्ध शाकाहारी आहे. मी कांदा कधी खाला नाही. मला कांद्याच्या किंमतीबद्दल काहीही माहित नाही, मग मी कसं यावर काही बोलू, असं अजब वक्तव्य केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी केलं आहे.

तत्पूर्वी बुधवारी संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला होता. त्यावेळी काही खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना ‘तुम्ही कांदा खाता का?’ असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या होत्या की, ‘मी जास्त कांदा-लसूण खात नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे जिथे कांदा-लसूण याला जास्त महत्व नाहीये.’ तसेच ‘इजिप्तमधून कांदा मागवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, कांद्याच्या वाढत्या किंमतीविरोधात देशभरात निदर्शने केली जात आहे. कांद्याचे दर कोलकात्यासारख्या शहरांमध्ये किलोमागे 150 किलोपर्यंत पोहोचले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी तयार झालेला कांदा गोदामात ठेवला आहे त्यांना कांदा चोरीला जाण्याची भीती सतावते आहे. मध्य प्रदेशातील एका शेतकऱ्याने त्याचा 30 हजार रुपये किंमतीचा कांदा चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. चोरी टाळण्यासाठी आता या शेतकऱ्यांनी पहारा द्यायला सुरुवात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या