
मालवाहतूक करणाऱ्या एका ट्रकच्या कॅबिनमध्ये कोतवाली पोलिसांना देशी विदेशी दारूचे सात बॉक्स आढळून आले आहेत. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुद्देमालासह ट्रक व चालकास ताब्यात घेतले आहे. अरुण सुखदेव लंके (रा.चिखली ता.श्रीगोंदा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
कोतवाली पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,’एक मालवाहतूक ट्रकमधून बेकायदा विनापरवाना दारूची वाहतूक होत आहे. ही माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी कायनेटिक चौकात सापळा लावला. संशयित ट्रक थांबवून पाहणी केली असता ट्रकच्या कॅबिनमध्ये सात देशी विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. त्याच्या ताब्यातील 10 लाख 52 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये ट्रक आणि देशी-विदेशी दारूचा सामावेश आहे.
पोलीस कॉन्स्टेबल कैलास शिरसाठ यांच्या तक्ररीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात अरुण सुखदेव लंके या ट्रक चालकावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, अमोल गाढे, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत आदींनी केली आहे.
























































