
सामना ऑनलाईन । मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने जळगावमधील उमेदवार बदलला. स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून शेवटच्या क्षणी भाजपने चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली. उन्मेष पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वतः स्मिता वाघ याही हजर होत्या. भाजपने 26 मार्च रोजी जी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये स्मिता वाघ यांचा समावेश होता. विद्यमान खासदार ए. टी. नाना पाटील यांना उमेदवारी नाकारत विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली होती. स्मिता वाघ यांनी प्रचारालाही सुरुवात केली होती. वाघ यांच्या उमेदवारीवर भाजपमधील एक गट नाराज होता. या नाराजीची दखल घेत पक्षाने वाघ यांच्या उमेदवारीचा निर्णय मागे घेतला.


























































