अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्याला झोडपले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा शहर आणि परिसराला बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले.विजांच्या कडकडाटासह जवळपास पाऊणतास पाऊस पडत होता. सूर्यदेवाच्या प्रकोपामुळे असह्य उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांना या पावसाने काहीसा दिलासा मिळवून दिला. सातारा तालुक्याचा पूर्व भाग, फलटण शहर व परिसर तसेच कोरेगावसह तालुक्याच्या दक्षिण भागातही अर्धा-पाऊण तास चांगला पाऊस झाल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला.

सूर्य आग ओकत असल्यामुळे सातारा शहर व परिसरात सकाळपासूनच असह्य उकाड्याने लोकांचा जीव कासावीस होत होता. बाहेर उन्हाचा चटका तर घरात उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ आली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास पाऊण तास विजांच्या कडकडाटासह या पावसाने शहर व परिसराला झोडपून काढले. या पावसानंतर वातावरणामध्ये काहीसा गारवा निर्माण झाला.

फलटण शहर परिसरात सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. यामुळे परिसरातील वीज गेली होती. दुष्काळी माण, खटाव, खंडाळा तसेच वाई, जावली आदी तालुक्यात ढगाळ वातावरण असून सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट धडकी भरवत आहे. मागील आठ दिवसांत जिह्यात विविध भागात अवकाळी पाऊस पडत असून, काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. त्यामुळे पिकांचे तसेच फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

महाबळेश्वर शहरात उन्हाळी हंगाम बहरत चालला आहे, येथे सहलीसाठी येणारे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज सकाळपासूनच शहरातील उकाड्यात वाढ झाली होती. दुपारी साडेतीन वाजता महाबळेश्वर शहरात पावसाने हजेरी लावली. प्रारंभी शांतपणे कोसळणाऱ्या पावसाने काही मिनिटातच उग्र स्वरूप धारण केले. ढगांच्या गडगडाटासह वादळी वारे सुरू झाले, मात्र तासाभरात पावसाने विश्रांती घेतल्याने महाबळेश्वरकरांचा जीव भांड्या पडला. दरम्यान, अचानक आलेल्या पावसाने पर्यटकांची तारांबळ उडाली.