अवकाळी पावसाचा बटाटा उत्पादनाला फटका; भावही नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात तुफानी वारा, गारांसह पडलेल्या अवकाळी पावसाने शेतीपिकांना मोठा फटका बसला. चांगले उत्पन्न हाती लागेल या अपेक्षेने जोपासलेल्या बटाटा पिकांनाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. सध्या हवामान बऱ्यापैकी कोरडे असल्याने बटाटा काढणी सुरु आहे. मात्र, अवकाळीमुळे उत्पादन घटले आहे. तसेच बटाट्याला भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

कवठे-टाकळी हाजी रोडजवळ स्वाती सुभाष रोहिले या महिलेने चार एकर क्षेत्रात बटाटा पीक घेतले होते. शेतीची मशागत लागवड खर्च पिक व्यवस्थापनास साठ हजार रुपये खर्च त्यांना आला. त्यात त्यांनी 60 कट्टे बटाटा बियाणे लावले होते. उत्पादन काढणी योग्य झाल्यानंतर काढणीस तीस हजार खर्च आला. ज्या चार एकर क्षेत्रात सरासरी 700 पिशव्या बटाटा उत्पादन निघत होते. त्याच क्षेत्रात यावर्षी मात्र 110 पिशवी उत्पन्न हाती आले. सध्याचा बाजार भाव 10 ते 15 रुपये प्रति किलो आहे. यात वाहतूक खर्च 50 रुपये खर्च होतात. त्यामुळे एवढी मेहनत घोऊनही शेतकऱ्यांचे नुकसानच होत आहे.

बटाटा पिकासाठी जास्त खर्च करूनही पिक ऐन जोमात असताना गारपीटीचा तडाखा बसला. दरवर्षी निघणाऱ्या 700 पिशवीस किमान पंधरा रुपये भाव मिळाला तरी भांडवल जाऊन बऱ्या पैकी हातात उत्पन्न मिळत होते. शेतात राबूनही नुकसानच होत असेल तर शेतकऱ्यांनी करायचे काय ? असा असा सवाल स्वाती रोहिले यांनी केला आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी झालेल्या तुफानी पावसात स्वाती रोहिले यांनी लाखो रुपये कर्ज काढून जीवापाड जपलेला व उत्पादन मिळण्याच्या स्थितीत आलेला खेकडा प्लांट पावसाने फुटला व सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. शासकीय अधिकाऱ्यांनी पंचनामे केले. पण दोन महिने झाले तरी अद्याप शासनाकडून कुठलीही मदत मिळाली नसल्याची खंत स्वाती यांनी व्यक्त केली आहे.

स्वाती यांनी मागील चार दिवसांपासून बाहेरील 70 मजूर मजूर तीनशे रुपये प्रतिदिन मजुरीवर घ्यावे लागले. तसेच उत्पादनातही मोठी घट झाल्याने यावर्षी बटाटा पिकातही तोटा झाल्याची खंत शेतकरी दिव्यतेज रोहिले यांनी व्यक्त केली आहे. स्वतः दिव्यतेज व आई स्वाती हे सातत्याने पिकांची देखभाल फवारणी लागवड काढणे इत्यादी शेतीविषयक काम करत असताना उत्पादन कमी आल्याने पदरी निराशा आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. डाळींबाच्या बागेत आंतरपीक म्हणून पावणे तीन लाख रुपये खर्चून बटाटा पीक घेतले पण उत्पादनात प्रचंड फटका बसल्याने सुमारे दोन लाख रुपयांचा तोटाच झाल्याचे शेतकरी छाया रामदास चोरे यांनी सांगितले.अवकाळीने झालेल्या शेतीची नुकसान भरपाई शासनाने तात्काळ देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.