
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या आणि हत्येची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. एका प्रेमप्रकरणामुळे बहीण भावांना प्राण गमवावे लागले आहेत. प्रेमसंबंधांमध्ये भावाचा अडसर होत असल्याने बहिणीने आत्महत्या केली. या आत्महत्येबाबत तिच्या प्रियकराला समजताच त्याने रागाच्या भरात प्रेयसीच्या भावाची हत्या केली. या प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
बुलंदशहरातील सिकंदराबादमधील ही घटना आहे. एका तरुणाची 12 नोव्हेंबरला गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. कटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यावर तपासात प्रेमपर्करणाची धक्कादायक बाब उघड झाली आहे. एका तरुणाच्या छेडछाडीने त्रासलेल्या मुलीने आत्महत्या केली. त्यानंतर त्या तरुणाने आपल्या मुलाची हत्या केल्याचे कटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते.
हत्या करण्यात आलेल्या भावाचे नाव रामवीर असून त्याच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. आकाश नावाच्या तरुणाचे आपल्या घरी जाणे-येणे होते. आपल्या मुलीशी तो छेड काढत होता. तसेच तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. याबाबत समजताच रामवीरने त्याला समज दिली होती. मात्र, आकाश मुलीची छेड काढत होता. त्याच्या त्रासाल कंटाळून मुलीने 8 नोव्हेंबरला विष प्राशन करून आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येबाबत आकाशला समजताच त्याने 12 नोव्हेंबरला रामवीरच्या घरी आला आणि त्याला गोळ्या घालून ठार केले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी सखोल तपास केला असता मुलीचे आणि तरुणाचे प्रेमसंबंध असल्याचे दिसून आले. या संबंधांमध्ये भावाचा अडसर होता. भावाच्या अडसरामुळे तरुणीने आत्महत्या केली. तिच्या प्रियकराला या आत्महत्येबाबत समजल्यावर त्याने रागाच्या भरात प्रेयसीच्या भावाला गोळ्या घालून त्याची हत्या केली. या प्रकरणी तरुणीच्या प्रियकरासह तीज जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून एकाला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आकाश, त्याचा भाऊ कपिल आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कपिलला अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे. पोलिसांच्या तपासात प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या आणि हत्या घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

























































