सामूहिक हत्याकांडाने प्रयागराज हादरले, पती-पत्नीसह 3 अल्पवयीन मुलींची निर्घृण हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज शहर सामूहिक हत्याकांडाने हादरले आहे. प्रयागराजपासून 35 किलोमीटर दूर नवाबगंज येथे एकाच कुटुंबातील पाच जणांना अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. पती-पत्नी आणि तीन मुलांना आरोपीने झोपेत असतानाच ठार केले. यामुळे खळबळ उडाली आहे.

राहुल तिवारी (वय – 42), प्रिती तिवारी (वय – 38), माही तिवारी (वय – 12), पिहू तिवारी (वय – 7) आणि पाहू तिवारी (वय – 5) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी सकाळी पाचही जणांचे मृतदेह राहत्या घरामध्ये आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारी दाम्पत्य आपल्या तिन्ही मुलींना घेऊन खागलपूर गावात भाड्याच्या घरामध्ये रहात होते. ते मूळचे कौशांबी येथील रहिवासी आहे. शनिवारी सकाळी घरामध्ये कोणतीही हालचाल न दिसल्याने शेजारी राहणाऱ्यांना शंका आली. त्यांनी दार ठोठावूनही पाहिले, मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे त्यांनी पोलिसांना पाचारण केले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा पाच जणांचा खून झाल्याचे उघड झाले. झोपेत असतानाच पाचही जणांना ठार करण्यात आल्याचे उघड झाले असून घटनास्थळी वरिष्ठ अधिकारीही पोहोचले आहेत. हत्याचे कारण अद्याप उघड झालेले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच ओडिशामध्ये एका व्यक्तीने आपल्या मोठ्या भावासह त्याच्या कुटुंबाची धारधार हत्याराने वार करून खून केला होता. पाच जणांच्या हत्येनंतर आरोपीने याचा व्हिडीओ काढत गुन्हा कबूल केला आणि पोलीस स्थानकामध्ये सरेंडरही केले होते. शिवा प्रसाद साहू असे आरोपीचे नाव असून जमिनीच्या वादातून त्याने खून केल्याचे कबूल केले.