कुंभ मेळ्यात ‘डॅनियल’ बाबाचा बोलबाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लखनौ

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळ्यापेक्षा सध्या चर्चा रंगली आहे ती ‘डॅनियल बाबांची’. दीक्षा घेऊन हिंदू साधू बनलेले डॅनियल बाबा मूळचे फ्रान्सचे असून गेल्या ३० वर्षांपासून ते हिंदुस्थानात राहत आहेत. हिंदीत बोलणाऱ्या डॅनियल बाबांना लोकं भगवान गिरी म्हणूनही संबोधतात.

daniel-baba

माझं सनातन हिंदू धर्मावर प्रेम आहे. हा शांतिप्रिय धर्म आहे. परमेश्वर एकच असून आपणच त्याला वेगवेगळी नावे दिली आहेत. प्रेमामुळेच आनंद मिळतो असं हा धर्म शिकवतो. असं डॅनियल बाबांनी म्हटलं आहे. डॅनियल बाबांना हिंदू धर्माचे आधीपासूनच आकर्षण होते. हिंदू धर्माची शिकवण, संस्कृती याबद्दल आस्था असल्यानेच त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. ३० वर्षांपूर्वी ते हिंदुस्थानात पर्यटनाला आले होते. येथील धार्मिक स्थळ बघत असतानाच त्यांनी हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर ते कधीही फ्रान्सला गेले नाहीत. डॅनियल बाबा आनंद अखाड्याशी जोडले गेले आहेत. ते नेहमी भगवे वस्त्र परिधान करतात. कपाळावर हळद लावतात. साधुप्रमाणे आयुष्य जगतात. इतर साधुंबरोबरच ते राहतात. त्यांना ते गुरुभाई म्हणून बोलवतात. योग, भजन-कीर्तन आणि ध्यानधारणा हीच डॅनियल बाबांची दिनचर्या आहे.

फ्रान्सचे नागरिक असूनही डॅनियल बाबा साधु झाल्याने पर्यटक नेहमी त्यांना त्याबद्दल विचारतात. त्यावर डॅनियल बाबा त्यांना हिंदू धर्माचे महत्त्व सांगून सर्व प्रश्नांची शांतपणे उत्तरं देतात.