उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचे नाव बदलणार, सुलतानपूरचे होणार…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचे नाव बदलण्यात येणार आहे. शनिवारी राज्यपाल राम नाईक यांच्यासमोर सुलतानपूर जिल्ह्याचे नाव बदलून कुशभवनपूर करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. राज्यपालांनी याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिली असून लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सुलतानपूरचे नाव बदलण्याची मागणी नवीन नाही. याआधी लम्भुआ मतादारसंघातील भाजप आमदार देवमणि द्विदेदी यांनी गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये सुलतानपूरचे नाव बदलून कुशभवनपूर करण्यात यावे असा प्रस्ताव मांडला होता. अलाउद्दीन खिलजीने या शहराचे नाव बदलून सुलतानपूर ठेवल्याचा दावा त्यांनी यावेळी केला होता. त्यामुळे भगान श्रीरामाचे सुपुत्र कुश यांच्या नावावरून शहराचे नाव कुशभवनपूर ठेवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली होती. कुशभवनपूरचा उल्लेख 720 वर्षापूर्वी घोड्यांचे सौदागार सैय्यद मोहम्मत आणि सईद अला-उद-दीन यांनी अवधचा दौरा केला होता तेव्हापासून असल्याचा दावाही त्यांनी आपल्या वेबसाईटवर केला आहे.

केंद्रीय मंत्री मेनका गांधी आणि वरुण गांधी यांचा बालेकिल्ला म्हणून सुलतानपूर ओळखले जाते. आगामी लोकसभा निवडणूक देखील मेनका गांधी सुलतानपूर येथून लढणार आहेत. याआधी येथून वरुण गांधी लढत असत आता त्यांना पीलीभीत हा मेनका गांधी यांचा मतदारसंघ देण्यात आला आहे.

याआधीही उत्तर प्रदेशमधील विविध शहरांची नावे बदलण्यात आली होती. योगी सरकारने इलाहाबादचे प्रयागराज केले होते, तर मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून पंडित दीन दयाल उपाध्याय असे ठेवले होते, तसेच मथुरा जवळील फरह टाऊन स्टेशनचे नावही बदलण्यात आले होते.