भयानक! कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, आठवडाभर होता ताप; 24 तासांत तीन भावांचा तडफडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाचा प्रकोप दिसत असून लखीमपूर खिरी येथे एकाच कुटुंबातील तीन भावांचा 24 तासांत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तिघा भावांना आठवडाभरापासून ताप होता. मात्र गेल्या 24 तासांना तिघांना श्वास घेण्यास अडचण होऊ लागली आणि एक-एक करून तिघांचाही मृत्यू झाला.

तिघा भावांच्या लागोपाठ मृत्यूमुळे प्रशासन सतर्क झाले असून त्यांच्या कुटुंबियांना आयसोलेट करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. ‘नवभारत टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, तिन्ही भावांचे वय 53, 50 आणि 45 असे होते. याबाबत माहिती देताना डॉक्टरांनी सांगितले की, तिघांना न्यूमोनियाचा त्रास झाला होता आणि त्यांची तब्येत वेगाने खालावत होती. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र तब्येत अधिकच खालावल्याने गेल्या 24 तासात तिघांचा पाठोपाठ मृत्यू झाला. सर्वात मोठ्या भावाचा मृत्यू घरी, तर दोघांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

तिघे भाऊ व्यवसाय करत होते आणि त्यांनी कोरोना चाचणीही केली होती. मात्र ही चाचणी निगेटिव्ह आली होती. प्राथमित अंदाजानुसार तिघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला नसावा असे लखीमपूर खिरीचे सीएमओ मनोज अग्रवाल यांनी सांगितले. मात्र शवविच्छेदन अहवालानंतर सर्व काही स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

#Coronavirus ‘ही’ पाच लक्षणे आहेत जीवघेणी, दिसताच तात्काळ रुग्णालयात घ्या धाव

27 हजार नवीन रुग्ण

उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी कोरोनाचे 27 हजार 357 नवीन रुग्ण आढळले, तर 120 रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वाधिक 5913 रुग्ण लखनौमध्ये आढळले आहेत. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता सरकारने शनिवारी रात्री आठ ते सोमवार सकाळ 7 वाजेपर्यंत राज्यात कर्फ्यू लावला आहे.