
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) बुधवारी आपल्या परीक्षांसाठी एक नवीन ऑनलाइन अर्ज पोर्टल सुरू केल्याची घोषणा केली. या नवीन पोर्टलमुळे उमेदवारांना अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. यामुळे अर्ज भरण्यासाठी लागणारा वेळ वाचेल आणि सर्व परीक्षांसाठी एक सामाईक रेकॉर्ड तयार होण्यास मदत होईल.
आधार कार्डवर आधारित व्हेरिफिकेशन प्रक्रिया
UPSC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, उमेदवारांनी त्यांचे आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरावे, जेणेकरून त्यांची ओळख आणि इतर तपशीलांचे व्हेरिफिकेशन आणि प्रमाणीकरण सहज होऊ शकेल. हे पोर्टल सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी आणि सामाईक रेकॉर्ड म्हणून काम करेल. यामुळे उमेदवारांना प्रत्येक वेळी नव्याने तपशील भरण्याची गरज भासणार नाही.
जुने वन-टाइम रजिस्ट्रेशन मॉड्यूल रद्द
UPSC ने स्पष्ट केले आहे की, यापूर्वी वापरात असलेले वन-टाइम रजिस्ट्रेशन (OTR) मॉड्यूल आता लागू राहणार नाही. सर्व उमेदवारांना नवीन पोर्टलवर, म्हणजेच https://upsconline.nic.in वर जाऊन त्यांचे अर्ज भरावे लागतील.