आरोग्य सुविधांसाठी होणारे हाल पाहूनच यूपीएससी करण्याचा निर्धार केल, रामेश्वर सुब्बनवाडचे मनोगत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘गावाकडे आल्यानंतर आजारी पडलो. उपचारासाठी नांदेड येथे रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. या काळात आरोग्याच्या सुविधांसाठी झालेले हाल पाहुन पुण्यातील नोकरी सोडून देऊन थेट यूपीएससी करण्याचा निर्धार केला आणि त्यात यश मिळाले’, अशी भावना रामेश्वर सुधाकर सुब्बनवाड याने दैनिक सामनाशी बोलताना व्यक्त केली.

उदगीर तालुक्यातील हंडरगुळी गावचा रहिवासी असलेला रामेश्वर सुधाकर सुब्बनवाड हा युपीएससी परीक्षेमध्ये हिंदुस्थानातून 202वा क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाला. रामेश्वर सुब्बनवाड याचे पाचवीपर्यंतचे शिक्षण गावातील रामराव पाटील प्राथमिक विद्यालयामध्ये झाले. दहावी पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालयामधून त्याने पूर्ण केले तर अकरावी आणि बारावीचे शिक्षण भारतीय जैन संघटना पुणे येथे झाले. बारावीला चांगले गुण पडल्यामुळे पुणे येथेच शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालयातून सिव्हील इंजिनिअर म्हणून तो उत्तीर्ण झाला. विमान नगर येथे स्वतः खासगी शिकवणी क्लासेस चालवून त्यांनी आपला खर्च भागवला. पुणे येथील बांधकाम व्यवसाय कंपनीमध्ये नोकरी पण केली.

रामेश्वर म्हणाला की, गावी आल्यानंतर आजारी पडल्यामुळे उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करावे लागले. या काळात आरोग्य सुविधांसाठी होणारी ससेहोलपट पाहून पुण्यातील नोकरी सोडून थेट युपीएससी करणार असा निर्धार त्यांनी केला. 2019च्या मार्चमध्ये अभ्यास सुरू केला आणि 2020ला मुलाखतीपर्यंत पोहचलो. पण त्यामध्ये अपयश आले नंतर पुन्हा अभ्यास करून 2021 मध्ये पूर्व परीक्षा पास झालो तर जानेवारी 2022 मध्ये लेखी परीक्षा दिली आणि त्यातही पास झालो. दिनांक 12 मे 2022 रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या होत्या. त्याचा निकाल लागला आणि पूर्ण हिंदुस्थानातून 202वा क्रमांक आला असल्याचे समजले. या निकालाने माझ्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांना खूप आनंद झाला. माझ्या घरची परिस्थिती एकदम बेताची आहे. आई-वडील आणि दोन भाऊ असा आमचा पाचजणांचा परिवार आहे. वडील गावामध्ये छोटेसे किराणा दुकान चालवतात तर आई घरकाम करते. रोहित नावाचा एक भाऊ कॉम्प्युटर मध्ये इंजिनिअरींग झालेला आहे तर सौरभ हा बीबीएमध्ये पास झाला आहे, अशी माहिती रामेश्वर याने दिली आहे.

रामेश्वर सुब्बनवाड हा सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेत तो ह्युमन रिसोर्स विषयात व्यवस्थापकीय पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत आहे. तो सांगतो की, मला आयएएस झाल्यानंतर ग्रामीण भागातील मुलांसाठी शिक्षण व वैद्यकीय शिक्षण या क्षेत्रांमध्ये काम करावयाचे आहे. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची किती आवश्यकता आहे. याची जाणीव असल्याने त्यासाठी मी अहोरात्र झटणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी सतत आयुष्यभर प्रयत्न करणार आहे. तसेच ग्रामीण भागातील जनतेसाठी आरोग्य सुविधा अपुरी आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार, असेही त्याने सांगितले.