
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ (NDA) आणि ‘नेवल अकॅडमी’ (NA) परीक्षा (II) 2026 साठी ऑनलाईन अर्ज भरण्याचा 9 जून रोजी शेवटचा दिवस होता. . मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून यूपीएससीचे अधिकृत सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. अनेकांनी याबाबत तक्रार करण्याचा प्रयत्नही केला मात्र हेल्पलाईन नंबर देखील बंद असल्याचे समोर आले.
एनडीएच्या परीक्षेसाठी 9 जून रोजी संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. मात्र वेबसाईटचे सर्व्हर डाऊन झाल्याने अनेकांना अर्ज भरता आले नाही असा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. दरम्यान या अर्जाची मुदत आणखी दोन दिवसांनी वाढवावी अशी मागणी केली जात होती. अखेर UPSC ने विद्यार्थ्य़ांची मागणी लक्षात घेऊन या परीक्षांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आता 11 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

























































