उरणमध्ये सिलिंडर गळतीमुळे स्फोट; 4 जण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । उरण

उरण शहराच्या विमला तलावसमोरील मिनिल व्हिला इमारतीतील मोझीला कॅफे व रेस्टॉरंटमध्ये सिलिंडर गळतीमुळे स्फोट झाला. या दुर्घटनेत 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल व वाशी येथे उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर यांनी दिली.

उरण शहराच्या विमला तलावासमोरील मिनिल व्हिला इमारतीमध्ये 10 रहिवासी ब्लॉक असून 4 दुकानाचे गाळे आहेत. त्यापैकी प्रकाश भाईचंद ठक्कर यांच्या मालकीच्या गाळ्यात सहा महिन्यांपासून मोझिला कॅफे सुरु झाले होते. मंगळवारी रात्रीपासून एका सिलेंडरमधून वायूगळती होत होती. बुधवारी सकाळी 9.15 वाजता हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने नेहमीप्रमाणे कॅफेचे शटर उघडून विजेचे बटन दाबले असता गाळ्यातील गळती झालेल्या वायूचा दाब वाढल्याने स्फोट झाला. या स्फोटात पंखे, टेबल, खुर्च्या व इतर फर्निचर गाळयाबाहेर फेकले गेले. या दुर्घटनेत मनीष सुरेंद्र हिरा (35) हा कामगार 70 टक्के भाजला आहे. त्याला ऐरोली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर कॅफेसमोरील रस्त्यावर 20 फूटांपर्यंत सामान फेकले गेले. त्यामुळे संजय ठाकूर(48), दमर भूल (24) या दोन पादचाऱ्यांसह रिक्षातुन प्रवास करणारे संजय ठाकूर (54) जखमी झाले आहेत. जखमींना पनवेल व वाशी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी दोन भरलेले सिलिंडर होते. त्यांनीही पेट घेतला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.