
सामना ऑनलाईन, वॉशिंग्टन
अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त झटका बसला आहे. अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हवर डेमोक्रेटिक पक्षाने नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या एकतर्फी निर्णयांना लगाम घालण्याबरोबरच चौकशी करण्याचे अधिकारही डेमोक्रेटिक प्रतिनिधींना मिळाले आहेत. ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाने सिनेटमधील बहुमत मात्र कायम राखले आहे. तरीही यापुढे कोणाताही निर्णय घेताना त्यांना डेमोक्रेटिक प्रतिनिधींचे मत घ्यावे लागणार आहे.
2016 मध्ये डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले. त्यावेळी प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट अशा दोन्ही महत्त्वाच्या सभागृहांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व होते. आता झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये सिनेटमधील 100 पैकी 51 जागा रिपब्लिकन पक्षाने जिंकल्या असून 45 जागा डेमोक्रेटस्ना मिळाल्या आहेत. इंडियाना, टेक्सास आणि उत्तर डेकोटा प्रांतातील सिनेटच्या जागा रिपब्लिकन पक्षाने जिंकल्या आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हवर मात्र डेमोक्रेटिक पक्षाने आठ वर्षांनंतर पुन्हा वर्चस्व मिळवले आहे. डेमोक्रेटिक पक्षाने 19 जागांची आघाडी घेतली आहे. स्थलांतरितांचा असो की जेरुसलेमचा, ट्रम्प यांच्या अनेक निर्णयावर जगभरातून टीका झाली होती. ओबामा यांनी घेतलेलेही अनेक निर्णय त्यांनी बदलले होते.
89 महिला विजयी
हाऊसमध्ये एकूण 89 महिला प्रतिनिधी निवडून आल्या आहेत. हा आतापर्यंतचा विक्रम आहे. यापूर्वी महिला प्रतिनिधींचा आकडा 84 पर्यंत गेला होता. डेमोक्रेटिक पक्षाकडून इल्हान उमर आणि रशिदा तालिब या दोन मुस्लिम महिलाही प्रथमच निवडून आल्या आहेत.




























































