
सध्या लिंबांचे दर सामान्य ग्राहकाच्या खिशाला न परवडणारे झाले आहेत. त्यातच घडलेल्या एका विलक्षण चोरीच्या घटनेने भर टाकली आहे. एका व्यापाऱ्याच्या गोदामावर चोरी झाली असून चोरांनी पैसे न चोरता भलताच ऐवज लुटून नेला आहे.
उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूर येथे ही घटना घडली आहे. येथील तिलहर परिसरात बजरिया नावाचा बाजार आहे. तिथे राहणाऱ्या मनोज कश्यप यांचं दुकान या बाजारात आहे. कश्यप यांच्या दुकानात फक्त लिंबू, हिरवी मिरची, कांदा आणि लसूण विकली जाते.
सोमवारी मध्यरात्री मात्र कश्यप यांच्या गोदामात चोरी झाली. चोरांनी त्यांच्या गोदामात शिरून महागडे लिंबू, कांदे, लसूण अशा सगळ्यावर डल्ला मारला. या चोरांनी कश्यप यांच्या गोदामातून 60 किलो लिंबू, 40 किलो कांदे आणि 38 किलो लसूण पळवून नेला.
सध्या लिंबांचे दर आकाशाला भिडले आहेत. ठोक बाजारात एका किलोमागे 280 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे बाजारात अचानक लिंबांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे कश्यप यांच्याकडून चोरीला गेलेल्या लिंबांची बाजारभावाची किंमत तब्बल 12 हजार रुपये इतकी असल्याची माहिती मिळत आहे. या चोरीमुळे अन्य व्यापारी धास्तावले आहेत.



























































